जनता घरात... कोरोना योद्धे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:15+5:302021-05-19T04:23:15+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून बचाव करण्याकरिता जनतेला घरात बसवून शहरातील पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी कोरोनाशी रस्त्यावरची लढाई लढत ...

जनता घरात... कोरोना योद्धे रस्त्यावर
कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून बचाव करण्याकरिता जनतेला घरात बसवून शहरातील पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी कोरोनाशी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. कधी ढगाळ, तर कधी पावसाळी वातावरण, कधी कमालीचा उष्मा, तर कधी जोराचे वारे, पाऊस सोसत जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन हे कोरोना योद्धे अव्याहतपणे राबत आहेत.
कोल्हापूर शहराची जवळपास साडेपाच लाख जनता गेल्या काही दिवसांपासून घरात थांबली आहे, रविवारपासून तर कडक लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांनी घराचा उंबरा ओलांडलेला नाही. अगदीच प्रसंग आला तर दवाखान्यात जाण्याकरिताच लोक बाहेर पडत आहेत. बाकी संपूर्ण वेळ स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. जनतेच्या दृष्टीने हा कठीण काळ असला तरी अशा कठीण काळातही काही हात जनतेच्या सोयीकरिता राबत आहेत.
कोरोनाची भीती धुडकावून लावत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून काम करत आहेत. जनता घरात असताना त्यांची नागरी सुविधाअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. कोरोनासारख्या महामारीत घराचा परिसर, गल्ली, चौक, मुख्य रस्ते स्वच्छ करण्याचे काम महानगरपालिकेतील आरोग्य विभाग करत आहे.
शहर स्वच्छता करण्याच्या कामात १९०० सफाई व झाडू कामगार, १६ आरोग्य निरीक्षक, चार विभागीय निरीक्षक व एक मुख्य निरीक्षक सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत राबताना दिसत आहेत. रस्ते स्वच्छ करणे, कचरा उठाव करणे, कंटेनर साफ करणे आणि उचललेला सर्व कचरा डेपोवर जाऊन टाकणे यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेने मास्क, सॅनिटायझर, साबण, हँडग्लोव्हज दिले आहेत. ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना तर गमबूटसुद्धा दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी शहर आणि जिल्ह्यात वादळी वारे तसेच जाेराचा पाऊस झाला. त्यावेळी अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्या. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. शहरात अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन भरपावसात कामे करत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिका लाईट शाखेचे कर्मचारीही या पावसात रस्त्यावरील विद्युत पुरवठा कसा सुरळीत राहील यासाठी धडपडत होते.
शहरात कडकडीत लॉकडाऊनमुळे सर्व काही थांबले असताना नियमित पाणीपुरवठा मात्र ठरलेल्या वेळेत होत आहे. रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत शहरातील पाण्याच्या टाक्या भरून घेण्यापासून ते प्रत्येक घरात वेळेवर पाणी कसे पोहोचेल यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सुमारे तीनशेहून अधिक कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यामध्ये पाणी सोडबंद करणाऱ्या चावीवाल्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना योद्धे रस्त्यावरची लढाई करत आहेत म्हणून जनतेला सर्व सुविधा मिळत आहेत.
(फोटो देत आहे)