‘पीटीएम’ची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:56 IST2017-01-21T00:54:13+5:302017-01-21T00:56:05+5:30
तिसऱ्यांदा पटकाविला केएसए चषक : अखेरच्या सामन्यात ‘बालगोपाल’वर ३-० ने मात; दिलबहार ‘अ’ला उपविजेतेपद

‘पीटीएम’ची हॅट्ट्रिक
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ गट लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात पीटीएम ‘अ’ संघाने बालगोपाल तालीम मंडळावर ३-० अशी मात करीत १६ गुणांसह सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले, तर १५ गुण पटकाविणाऱ्या दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी सातव्या फेरीतील शेवटचा सामना पीटीएम ‘अ’ व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ओंकार जाधव, हृषिकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, वृषभ ढेरे, जो पॉवलो, रूपेश सुर्वे यांनी ‘बालगोपाल’च्या गोलक्षेत्रात आक्रमण केले. मात्र, ‘बालगोपाल’चा गोलरक्षक नीलेश भोईने तितक्याच चपळाईने परतावून लावले. दोन्ही संघांना पूर्वार्धाच्या शेवटपर्यंत गोल करण्यात यश आले नाही.
उत्तरार्धात पीटीएम ‘अ’ संघाकडून आक्रमणाची धार वाढविण्यात आली. त्यात ६६व्या मिनिटास पीटीएम ‘अ’कडून अक्षय मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर ओंकार जाधवने हेडद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘बालगोपाल’च्या गोलरक्षकाने तो तटविला. हीच संधी साधत हृषिकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘बालगोपाल’कडून सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पीटीएम ‘अ’ आक्रमणाची धार वाढली होती. ७० व्या मिनिटास पुन्हा पीटीएम‘अ’ कडून हृषिकेश मेथे-पाटीलच्या पासवर ओंकार जाधवने गोल नोंदवीत २-० आघाडी घेतली. पुन्हा ७३ व्या मिनिटास पीटीएम ‘अ’ कडून हृषिकेश मेथे-पाटीलने मिळालेल्या संधीवर गोलरक्षकाला चकवत गोल नोंदवत आघाडी ३-० अशी भक्कम केली. ही आघाडी कायम राखत सामन्यासह विजेतेपदावर पीटीएम ‘अ’ ने शिक्कामोर्तब केला. गुरुवारी झालेल्या दिलबहार ‘अ’ व फुलेवाडी फुटबॉल संघाच्या सामन्यात बरोबरी झाल्यानंतर पीटीएम ‘अ’ ला सामना जिंकणे क्रमप्राप्त बनले होते. ‘दिलबहार’चे १५ गुण झाले होते, तर पीटीएम ‘अ’ला बालगोपाल संघाने बरोबरीत रोखले असते तर त्यांचे १४ गुण झाले असते. या गुणसंख्येमुळे पीटीएम‘अ’ने अखेरच्या सामन्यात चुरशीचा व आक्रमक खेळ केला. विजेत्या पीटीएम ‘अ’ संघास ३० हजार रोख व चषक, तर उपविजेत्या दिलबहार ‘अ’ संघास २० हजार रोख व चषक देण्यात आला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्रीमंत शाहू महाराज, खासदार युवराज संभाजीराजे, मधुरिमाराजे, के.एस.ए. अध्यक्ष सरदार मोमीन, साहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, के.एस.ए. पदाधिकारी दीपक शेळके, माणिक मंडलिक, राणोजी घोरपडे-कापशीकर, ‘कॉस्को’चे राकेश शर्मा व के.एस.ए. पदाधिकारी उपस्थित होते. सामन्याचे निवेदन विजय साळोखे यांनी केले. (प्रतिनिधी)
मानांकन असे
संघगुण
पीटीएम ‘अ’१६
दिलबहार ‘अ’१५
प्रॅक्टिस क्लब ‘अ’१४
खंडोबा तालीम मंडळ ‘अ’१३
बालगोपाल तालीम मंडळ१२
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ११
शिवाजी तरुण मंडळ १०
संघगुण
शिवनेरी स्पोर्टस्०९
संध्यामठ तरुण मंडळ०८
दिलबहार ‘ब’०७
साईनाथ स्पोर्टस्०६
कोल्हापूर पोलिस संघ०५
उत्तरेश्वर प्रा. वाघाची तालीम०४
पीटीएम ‘ब’०३