‘पीटीएम’ची दमदार सुरुवात
By Admin | Updated: November 26, 2014 00:52 IST2014-11-26T00:51:00+5:302014-11-26T00:52:37+5:30
केएसए लीग फुटबॉल : ‘फुलेवाडी’वर ३-२ने मात, ‘दिलबहार’ - ‘उत्तरेश्वर’ सामना बरोबरीत

‘पीटीएम’ची दमदार सुरुवात
कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल सामन्यात आज, मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडामंडळावर ३-२ अशा गोलफरकाने मात करीत दमदार सुरुवात केली; तर अन्य एका सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यामध्ये झालेला सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर यंदाच्या फुटबॉल हंगमातील आज पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना होता. दोन्ही संघ तगडे असल्याने सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभास दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करीत एकमेकांचा अंदाज घेत खेळण्यास सुरुवात केली. काही मिनिटांनी ‘फुलेवाडी’ने शॉर्ट पासवर भर देत खोलवर चढाया केल्या. यामध्ये ‘फुलेवाडी’ संघाच्या अजित पोवारच्या पासवर राजा दासने गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. या गोलनंतर पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने आक्रमण खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये हृषीकेश मेथे-पाटीलने १६ व्या मिनिटाला गोल करीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. दोन्ही संघांनी आघाडी भक्कम करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ४०व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’च्या हृषीकेश मेथे-पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल नोंदवीत सामन्यात एक गोलची आघाडी घेतली. ही आघाडी अल्पकाळच टिकली. ‘फुलेवाडी’ संघाच्या राजा दासनेही वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल करीत मध्यंतरापर्यंत सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत केला.
उत्तरार्धात ‘फुलेवाडी’ने थोडी आक्रमक खेळी केली. मात्र, पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने आक्रमकच पवित्रा घेत खेळी करण्यास सुरुवात केली. ७३ व्या मिनिटाला ओमकार जाधवच्या पासवर नियाज पटेलने गोल करीत सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. ती कायम ठेवण्यास पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाला शेवटच्या मिनिटापर्यंत यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)
‘दिलबहार’-‘उत्तरेश्वर’चा तोडीस तोड खेळ
पहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना खाते उघडता न आल्याने सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दिलबहार तालीम मंडळाच्या आदित्य मानेने ५३ व्या मिनिटाला गोल करीत संघाचे गोलचे खाते उघडले. ही आघाडी ६० व्या मिनिटाला उत्तरेश्वर संघाच्या ओंकार लोकरेने कमी केली. ७७ व्या मिनिटाला आदित्य माने याने गोल करीत सामन्यात २-१ ने आघाडी घेतली.
सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ‘उत्तरेश्वर’ संघाच्या रोहन डकरेने गोल नोंदवीत सामन्यात २-२ अशा गोलफरकाने बरोबरी केली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यात ‘फुलेवाडी’च्या खेळाडूंनी मारलेला चेंडू गोल पोस्टच्या बाहेर ढकलताना ‘पाटाकडील’चा गोलरक्षक शैलेश पाटील.