सुविधा दिल्यास अन्य राज्यांत जाणार नाही
By Admin | Updated: November 10, 2014 00:46 IST2014-11-10T00:13:42+5:302014-11-10T00:46:25+5:30
सुविधा प्रश्न : गोशिमा उद्योजकांची भावना

सुविधा दिल्यास अन्य राज्यांत जाणार नाही
कणेरी : महाराष्ट्र शासनाने पायाभूत सुविधांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे मत गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा)च्या उद्योजकांनी व्यक्त केले.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीसाठी जादा जागा व सुविधा मागणीसाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळासह नूतन उद्योगमंत्री प्रकाश मेहता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव भूषण गगरानी यांची भेट घेणार असल्याचे ‘गोशिमा’चे मावळते अध्यक्ष उदय दुधाणे यांनी सांगितले.
आघाडी सरकारच्या काळात मंत्री, अधिकारी, यांनी आपल्या पै-पाहुण्यांच्या नावावर केवळ गुंतवणूक म्हणून खरेदी केलेले औद्योगिक वसाहतीमधील भूखंड शासनाने परत द्यावेत व अधिकारी, राजकीय लोकांचे भूखंड उद्योगांसाठी खुले करावेत, असे मतही यावेळी उद्योजकांनी मांडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांच्या उद्योगांबाबतच्या धोरणांचे उद्योजकांनी यावेळी कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत जाधव, नूतन अध्यक्ष अजित आजरी, देवेंद्र दिवाण, सेक्रेटरी जे. आर. मोटवाली, राहुल बुधले, आर. पी. पाटील, मोहन पंडितराव, एस. एस. पाटील, सुरजितसिंह पवार, आदींनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूरच्या प्रादेशिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासह अधिकाऱ्यांबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त करून अधिकारी भूखंड देण्यासाठी निरुत्सुक असल्याचे सांगून उद्योजकांना कामाबाबत उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी नाराजी उद्योजकांनी व्यक्त केली. महामंडळाच्या कार्यालयातील कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील, अशा भावनाही यावेळी उद्योजकांनी व्यक्त केल्या. (वार्ताहर)