‘डिजिटल लॉकर’ची सुविधा उपलब्ध करून देणार

By Admin | Updated: July 2, 2015 01:06 IST2015-07-02T01:04:55+5:302015-07-02T01:06:43+5:30

कुलगुरूंची ग्वाही : आठवडाभरात कोल्हापूरकरांसाठी सेवा मिळणार; शिवाजी विद्यापीठात डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन

Providing 'Digital Locker' facility | ‘डिजिटल लॉकर’ची सुविधा उपलब्ध करून देणार

‘डिजिटल लॉकर’ची सुविधा उपलब्ध करून देणार

कोल्हापूर : डिजिटल लॉकर उघडण्याचा संकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून ही सेवा केवळ विद्यापीठापुरती मर्यादित न ठेवता पुढील आठवडाभर कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी येथे दिली.विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ‘डिजिटल इंडिया’सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया सप्ताहाअंतर्गत ठोस उपक्रम राबविण्याचे ठरवून विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी यांना डिजिटल लॉकर सुविधा ओपन करून देण्याचा संकल्प विद्यापीठ प्रशासनाने सोडला. कोल्हापूरमधील नागरिकांना याठिकाणी डिजिटल लॉकर सुविधा खुली करून देण्यासाठी सेवा पुरविण्यात येईल. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते डिजिटल इंडियाची माहिती देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, इन्फॉर्मेशन किआॅस्कवर डिजिटल लॉकर उघडण्याच्या सेवेचा प्रारंभ झाला. या सप्ताहानिमित्त संगणकशास्त्र अधिविभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘डिजिटल इंडिया’ विषयाला अनुसरून पोस्टर प्रदर्शन भरविले आहे. त्यात भारताच्या डिजिटल प्रगतीचे वर्तमान व भविष्य अधोरेखित करणारी एकूण ३५ पोस्टर मांडली आहेत. कार्यक्रमास डॉ. यु.आर. पोळ, डॉ. के. एस. ओझा, व्ही. एस. कुंभार, पी. एस. करमरकर, पी. टी. गोयल, पी. एस. वडार, के. जी. खराडे, एस. व्ही. कोरवी, स्वाती चौगुले, दत्तात्रय पाटील, एस. व्ही. कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


आधारकार्ड, मोबाईल क्रमांक महत्त्वाचा
आपली महत्त्वाची कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करण्यासाठी ‘डिजीटल लॉकर’ उपक्रम महत्त्वाचा आहे. एकदा संबंधित कागदपत्रे स्कॅन करून आपल्या डिजटल लॉकरमध्ये ठेवल्यास ती कधीही आॅनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध होतात. ही संकल्पना केंद्र सरकारने विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. संगणकशास्त्र विभागामधील २५ संगणक डिजिटल लॉकर सुविधा उघडण्यासाठी उपलब्ध आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत इच्छुक नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले. ते म्हणाले, इच्छुकांनी येताना सोबत आपले आधारकार्ड व त्यावर नोंदविलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावा.

Web Title: Providing 'Digital Locker' facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.