आजरा : जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थांना बल्क कुलर, मिल्को टेस्टर / इको मशीन, सचिव संगणक यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करावी. जिल्हास्तरीय एकात्मिक दूध व्यवसाय विकास योजनेंतर्गत निधी मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दूध हा नाशवंत पदार्थ आहे. तो योग्य प्रकारे संकलित न केल्यास काही कालावधीतच खराब होतो. त्यासाठी दुधाचे संकलन हे गाव पातळीवर करण्यात येत असल्याने साठवणूक क्षमता वाढविण्याकरिता बल्क मिल्क कुलर व दूध स्वीकृतीच्या वेळेत दुधाची गुणवत्ता तपासणी आवश्यक असल्याने सचिव संगणक ही उपकरणे दूध संस्थांच्या स्तरावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
यासाठी राज्य शासनाच्या एकात्मिक दुग्ध विकास योजनेअंतर्गत दूध संस्थांना अनुदान मिळते. सचिव संगणक, मिल्को टेस्टर / इको मशीन, १ हजार लिटरपर्यंत बल्क कुलर ७५ टक्के अनुदानावर, तर दोन हजार ते तीन हजार लिटरपर्यंतचे बल्क कुलर ५० टक्के अनुदानावर उपलब्ध होते. यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये निधीची तरतूद करून जिल्ह्यातील दूध संस्थांना लाभ मिळवून द्यावा, अशीही मागणी निवेदनातून बाळासाहेब पाटील - हालेवाडीकर यांनी केली आहे.