कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे; पण, योग्य निधी न मिळाल्याने कामे रखडली आहेत, त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर अतिवृष्टीने ३५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांना मदत करा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तब्बल ३५२ हेक्टर क्षेत्रातील ऊस, भात, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीचा तातडीने पंचनामा करा, पंचनाम्यानंतरचा अहवाल त्वरित शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून आर्थिक मदत द्यावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यासाठी मदत करा, शेतकऱ्यांना बियाणे व खते अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून परतीच्या पिकांची पेरणी करता येईल, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
आमदार पाटील यांनी या केल्या मागण्या..वीज दरवाढीमुळे कोल्हापुरातील उद्योजक कर्नाटकात स्थलांतरित होत असून, शासनाने योग्य निर्णय घ्यावा. शहरातील रस्ते ड्रेनेज, पाणीपुरवठा खुदाईमुळे व आयआरबीने केलेले रस्तेही खराब झाले आहेत, त्यांना निधी द्या, कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीसाठी १३० कोटी द्या. पुणे-कोल्हापूर सहा पदरी महामार्गानजीक नियोजित रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार केलाय, त्यासाठी निधीची गरज आहे. अंबाबाई विकास आराखडा, राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखड्याला चालना द्या, करवीर व राधानगरी तहसील कार्यालयासाठी निधीची गरज, केशवराव भोसले नाट्यगृहाचा उर्वरित निधी द्या, अशा मागण्या पाटील यांनी केल्या आहेत.