राणेंवर टीका करण्यापूर्वी स्वत:ची पात्रता सिद्ध करा
By Admin | Updated: August 8, 2014 00:40 IST2014-08-08T00:12:51+5:302014-08-08T00:40:16+5:30
सतीश सावंत : दीपक केसरकर यांना लगावला टोला

राणेंवर टीका करण्यापूर्वी स्वत:ची पात्रता सिद्ध करा
कणकवली : स्वत:च्या स्वार्थासाठी दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे यांच्यापेक्षा दहापटीने विकास करणार असल्याची वल्गना ते करीत आहेत. मात्र, राणेंवर विनाकारण टीका करण्यापूर्वी त्यांनी प्रथम आपली पात्रता सिद्ध करावी आणि त्यानंतरच टीका करावी, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, नगरसेवक अण्णा कोदे उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, आपल्यासोबत १० हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा वल्गना दीपक केसरकर करीत होते. मात्र, उद्धव ठाकरे सावंतवाडी येणार असल्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी भागातील शिवसैनिकच या प्रवेशावेळी उपस्थित होते. त्यामुळे किती लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला हा खरे तर संशोधनाचा विषय आहे.
राष्ट्रवादीत असताना त्यांच्या पक्षाचे अर्थमंत्री तसेच बांधकाममंत्री असूनही दीपक केसरकर आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. आंबोली घाटाचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला आहे. राष्ट्रवादीने मंत्रीपद न दिल्याच्या नैराश्यातून तसेच माजी आमदार शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानेच केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शैलेश परब हे इच्छुक होते. त्यांची मुंबई येथे केसरकर यांनी भेट घेतली आहे.
शिवसेना प्रवेशामागे केसरकर यांचा स्वार्थ नसेल तर शैलेश परब यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणार का? हे जाहीर करावे. सतीश सावंत यांची आपल्यावर टीका करण्याची पात्रता नाही असे म्हणणाऱ्या केसरकर यांनी नारायण राणेंवर बोलण्याची आपली पात्रता आहे का? हे प्रथम सिद्ध करावे आणि त्यानंतरच राणेंवर टीका करावी. दहशतवादावर बोलण्याचा केसरकरांना काहीही अधिकार नाही. १९९२ मध्ये आर. बी. दळवी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करताना दोडामार्गसह इतर भागातील चार महिला जिल्हा परिषद सदस्यांना किडनॅप करण्यात आले होते. या प्रकरणाचे सूत्रधार केसरकर हेच होते. तेरा वर्षांपूर्वी सावंतवाडीत एका डॉक्टरचा खून झाला होता. त्यावेळी केसरकर मूग गिळून गप्प का होते? याचे उत्तरही त्यांनी द्यावे. उमेश कोरगांवकर यांना झालेल्या मारहाणीनंतर हे चांगले झाले असे म्हणणारे केसरकर हेच होते. त्यामुळे नारायण राणे यांचे नाव न घेता केसरकर यांनी राजकारण करून दाखवावे. (वार्ताहर)