सावरवाडी येथे तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:25+5:302021-07-12T04:16:25+5:30
सावरवाडी : जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी बांधलेला सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळल्याने ...

सावरवाडी येथे तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळला
सावरवाडी : जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी बांधलेला सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक धोकादायक बनली आहे. संरक्षक कठड्याचे नव्याने बांधकाम करण्याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यानंतर संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावच्या तिन्हीही बाजूंनी तुळशी नदी वाहते. पूर्व पश्चिम आरे - सावरवाडी गावांना जोडणारा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या रस्त्यानजीक तुळशी नदीचे पात्र आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी संरक्षक कठड्याची उभारणी केली होती. मात्र, या संरक्षक कठड्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.
तुळशी नदीपात्रात पुराच्या पाण्याचा प्रवाह जादा असल्यामुळे संरक्षक कठड्यावर पाण्याचा जादा दाब पडतो. संरक्षक कठड्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झाल्याने कठड्याच्या मधील काही भाग गतवर्षी कोसळला होता. जून महिन्यात झालेल्या पहिल्या पावसामुळे पृष्ठभागाची पडझड होऊन संरक्षक कठड्याचा उर्वरित भाग कोसळल्याने या मार्गाने ग्रामीण भागातील होणारी अवजड वाहतूक धोकादायक बनली आहे.
तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठड्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून होत असून, शासकीय निधीअभावी कठड्याचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
फोटो ओळ = सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळल्याने मुख्य रस्त्यावरून होणारी वाहतूक धोकादायक बनली आहे.