विहाळी येथे गिधाड संरक्षण

By Admin | Updated: November 30, 2015 01:06 IST2015-11-30T00:28:58+5:302015-11-30T01:06:40+5:30

सुरेश सुतार : मृत जनावरे केंद्रात जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला

Protection of the vulture at Bhiwala | विहाळी येथे गिधाड संरक्षण

विहाळी येथे गिधाड संरक्षण

खेड : खेड तालुक्यातील विहाळी गावातील ओसाड माळरानावर निर्माण करण्यात आलेल्या गिधाड खाद्य केंद्रामध्ये मृत जनावरे जमा करून गिधाडांचे खाद्य म्हणून वापरात आणण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे़ यामुळे गिधाडांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे संवर्धनही करण्यात येणार आहे. राज्य सरकारने आखलेल्या या अनोख्या उपक्रमाचे वन्यजीव व प्राणीमित्रांनी स्वागत केले आहे. यामुळे सध्या अल्प संख्येने असलेल्या गिधाडांचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे़ या केंद्रामध्ये मृत जनावरे आणून टाकणाऱ्यांना याचा मोबदला मिळणार असल्याची माहिती खेडचे परिमंडल वन अधिकारी सुरेश सुतार यांनी दिली़रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक अथवा दोन या प्रमाणात ही गिधाड खाद्य केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत़ शासनाच्या नियमानुसारच या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. गेले काही वर्षे राज्यामध्ये नेहमी दिसणारी गिधाडे आता दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे गिधाडांचे अस्तित्व टिकून राहिल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान सारख्या योजनांसह मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड यामुळे गावागावातील मृत जनावरांना टाकण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. तसेच अशा मृत जनावरांमुळे येणारी दुर्गंधी आणि यामुळे गिधाडांची येणारी वावटळ यामुळे गावात तसेच परिसरात याचा मोठा त्रास होत होता. कालांतराने गावातील लोकांनी मृत जनावरे ठराविक ठिकणी जमिनीत पुरण्याची प्रथा सुरू केली़ परिणामी गिधाडांचे खाद्य नष्ट झाले़ त्यामुळे ही गिधाडे गेली काही वर्षे दिसेनाशी झाली़ याबाबत विविध वन्यजीव व प्राणीमित्र संरक्षण समितीने आवाज उठविला. सरकारच्या ही बाब लक्षात आणल्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत गांभीर्याने विचार केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लोकवस्तीपासून एका बाजूला असलेल्या ओसाड जागेमध्ये अशी गिधाड खाद्य केंद्रे सुरू करण्याच्या योजनेला यामुळे मूर्त स्वरूप आले. ही गिधाड केंद्रे बांधून पूर्ण झाली असून, यामुळे गिधाडांना मृत जनावरांचे खाद्य उपलब्ध होणार असून, गिधाडांच्या संरक्षणास मदत होईल. (प्रतिनिधी)


आयते खाद्य : स्थलांतर रोखण्यात यश मिळणार
विहाळी गाव तसेच परिसरातील सर्व गावांमधील जनावरे मालकांनी त्यांची मृत जनावरे याच केंद्रामध्ये आणावयाची आहेत़ त्या बदल्यात त्यांना सरकारी दरानुसार योग्य मोबदला मिळणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. यामुळे गिधाडांचे संवर्धन होणार असून, त्यांना आयते खाद्य मिळणार असल्याने त्यांचे अन्यत्र होणारे स्थलांतर रोखण्यात यामुळे यश मिळणार आहे़ गिधाडांचे संवर्धन यामुळे चांगल्या प्रकारे होणार आहे.

संपर्क साधा
शेतकरी मित्रांनी तसेच जनावरांच्या मालकांनी आपली मृत जनावरे या केंद्रामध्ये आणावीत.. याबाबत काही शंका असल्यास भरणे येथील परिमंडल वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Protection of the vulture at Bhiwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.