अननस शेतीतून समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST2021-03-04T04:44:51+5:302021-03-04T04:44:51+5:30

---- काजू पिकासाठी प्रसिद्ध असलेला दोडामार्ग तालुका आता 'अननस' पिकाचा ब्रँड ठरत आहे. तालुक्यात शेकडो एकर क्षेत्र ...

Prosperity from pineapple farming | अननस शेतीतून समृद्धी

अननस शेतीतून समृद्धी

----

काजू पिकासाठी प्रसिद्ध असलेला दोडामार्ग तालुका आता 'अननस' पिकाचा ब्रँड ठरत आहे. तालुक्यात शेकडो एकर क्षेत्र अननस लागवडीखाली आले आहे. दोडामार्गच्या तांबड्या मातीतील पिकणाऱ्या अननसाला विशिष्ट चव असल्याने जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच गोवा व कर्नाटकात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अननस शेतीचे खरे शिल्पकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी सुरेश (भाई) यशवंत दळवी.

गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म आणि राजकीय कार्यकाळानंतर शेती व्यवसाय प्रामुख्याने 'अननस' शेतीत झोकून देऊन त्यांनी कृषी क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. दोडामार्गवासीयांनसाठी अनपेक्षित असलेली शेती त्यांनी अपेक्षित करून दाखविली. वृद्ध वयातील त्यांचे हे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेला दोडामार्ग तालुका महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक आहे. कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांचा संगम म्हणून या तालुक्याकडे पाहिले जाते. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत दोडामार्ग तालुका वसला असून, शेतीसाठी प्रगतिशील आहे. अलीकडच्या काळातील काजू हे मुख्य पीक आहे. बहुतांशी शेतकरी काजू पिकावर उदरनिर्वाह करीत आहेत. सध्या काजू पिकाबरोबरच दुसरे पीक उदयास आले आहे ते म्हणजे 'अननस' या पिकाची केरळच्या धर्तीवर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बागायती करण्यात येत आहे.

साटेली-भेडशी तसेच तिराळी या दशक्रोशीत ठिकाणी सुरेश दळवी यांनी शेकडो एकरमध्ये अननस शेती केली आहे. अननस शेतीमधील प्रगतिशील शेतकरी म्हणून आदर्शाने त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची माहिती देताना ते म्हणाले, इतर पिकांपेक्षा अननस पिकाची शेती करण्यास जास्त सोयीस्कर आहे. महत्त्वाचे म्हणजे या पिकाला जंगली प्राण्याकडून कोणताही धोका नाही. उन्हाळ्याचा किंवा अतिपावसाचा या पिकावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र या शेतीत उतरायचे असेल तर मोठ्या प्रमाणात लागवड करणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते या क्षेत्रात असल्याने त्यांचा गाढा अभ्यास आहे.

चाैकट

जमिनीची मशागत अशाप्रकारे करणे-

अननस बागेसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन ज्यादा उपयुक्त ठरते. अननसाचा माळा करताना प्रथमतः जमिनीतील झाडे मुळासकट काढून माती सैल करावी व व्ही (V) आकाराचे एक मीटरचे गादे तयार करावे. गाद्यांची उंची साधारण जमिनीपासून एक फूट असावी. जेणेकरून रोपांच्या मुळात पाणी साचून राहू नये. एक ते दोन फुटाच्या अंतरावर या रोपांची लागवड करावी. लागवड करतेवेळी रोपांच्या आकारमानानुसार खताचा वापर करावा. जास्त करून युरिया व सुपर फॉस्फेट ही खते रोपांना पोषक ठरतात व रोपांची वाढ जलदगतीने होते. लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी रोपांच्या वाढीनुसार त्यांना खताचा डोस देणे गरजेचे आहे. अननसाला पाण्याची जास्त आवश्यकता भासत नाही. रोप छोटे असताना आठवड्यातून दोन वेळा तर रोपांची साधारण वाढ झाल्यानंतर आठवड्यातून एकदा पाणी देणे गरजेचे आहे. पाणी देताना स्पिंकर द्वारे द्यावे. कारण स्प्रिंकरच्या होणाऱ्या पाण्याच्या फवारामुळे रोपांच्या पानावर असणारी धूळ व कीटक पाण्यासोबत खाली पडतात. पाणी पसरून पडल्याने मुळावरील मातीची धूप न होता रोपांची मुळे मजबूत राहण्यास मदत होते.

चाैकट

नवीन लागवडीसाठी फुटव्यांचा वापर

अननसाची रोपे साधारण मोठी झाल्यावर त्यांना मुळातून चारही बाजूने फुटवे फुटतात. सर्व फुटवे तसेच ठेवले तर त्याचा फळावर परिणाम होऊ शकतो. पळाला आवश्यक असणारी पोषक घटक फुटवे वाढीसाठी झाल्यास फळ लहान येते. त्यामुळे फुटवे मुळातूनच काढणे गरजेचे आहे. फुटवे काढण्यासाठी अनुभवी कामगारांकडून काढून घ्यावेत. नाहीतर रोपांना इजा होऊ शकते. काढलेल्या फुटव्यांचा नवीन लागवडीसाठी वापर केला जातो. आणि त्या फुटवे यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून, दरही चांगल्याप्रकारे आहे. त्यामुळे फळा व्यतिरिक्त फुटवे ही उत्पादनाचे साधन आहे.

चाैकट

फळाची देखभाल

अननस हे एका वर्षाच्या पीक आहे. रोपांची लागवड केल्यानंतर सात ते आठ महिन्यांत फलधारणा होण्यास सुरुवात होते. फळ लहान असताना उन्हाचा त्याच्यावर परिणाम होतो. उन्हामुळे फळ करपल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या वाढीवर होतो. फळ करपू नये यासाठी फळाभोवती गवत घालावे. त्यामुळे उन्हापासून त्याचे संरक्षण होते. फळ पूर्ण परिपक्व झाल्यावर दोन किलो एवढे वजनाचे होते. सध्या किलोमागे ५० रुपये एवढा बाजार भाव आहे. फळांच्या दोन जाती आहेत. 'किंग व क्वीन' 'नर व मादी', नर जातीचे फळ मोठे व थोडेसे आंबट असते, तर मादी जातीचे फळ चविष्ट रसाळ साखरेप्रमाणे गोड असते. एकदा लागवड केल्यावर अननसाची रोपे बरीच वर्षे टिकतात. मात्र चार वर्षानंतर रोपाला येणारी फळे आकाराने छोटी होतात. त्यामुळे शक्यतो चार वर्षांपर्यंत उत्पादन घ्यावे व चार वर्षांनंतर नवीन लागवड करावी.

चाैकट

विशिष्ट चवीमुळे बाजारपेठेत व्याप्ती वाढली

दळवी म्हणाले २०११ साली ज्यावेळी आपण लागवड केली. त्यावेळी बाजार भाव अत्यंत कमी होता. अननसाला बाजारपेठही उपलब्ध नव्हती. आपण स्वतः बाजारपेठेत घेऊन अननस व्यापाऱ्यांना घालायचो. दोडामार्गमधील तांबड्या मातीतील अननसाला एक विशिष्ट प्रकारची चव असल्याने मागणी वाढू लागली. आणि तसा प्रसारही झाला. सध्या या मागणीची बाजारपेठेत व्याप्ती वाढल्याने दोडामार्गमधील उत्कृष्ट चवीचे अननस अशी ओळख राज्य व राज्याबाहेर निर्माण झाली आहे. दिल्ली, गुजरात, राजस्थान, लखनऊ, जयपूर, पुणे, मुंबई, गोवा अशा मोठमोठ्या बाजारपेठेत मागणी आहे. आता बाजारपेठ शोधण्याची गरज नाही, तर हे व्यापारी बागेतूनच मालाची उचल करतात. त्यामुळे आता बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नसल्याचे दळवी यांनी सांगितले. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

चाैकट

३५ एकरमध्ये केले पहिले प्रात्यक्षिक

दळवी हे अननस शेती च्या अभ्यासासाठी स्वतः केरळ व कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. कर्नाटकमध्ये शिरशी व केरळमध्ये ताडपत्री या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून चार दिवसांत परिपूर्ण माहिती गोळा केली. अननसाची शेती कमी प्रमाणात करण्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात केल्यास कामगार व उत्पादनात जास्त नफा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याआनुषंगाने त्यांनी प्रथमतः ३५ एकरमध्ये २ लाख १० हजार रोपांचे प्रात्यक्षिक केले. यात त्यांना चांगल्याप्रकारे यश आले आणि आता त्यांची तिराळी, खानयाळे, झरेबांबर याठिकाणी शेकडो एकरमध्ये अननस बाग त्यांनी केली आहे. या बागेतून सरासरी लाखो रुपयांचे उत्पन्न ते घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

चाैकट

तरुण पिढीला आवाहन

तालुक्यात काजू हे मोठ्या प्रमाणात पीक आहे. परंतु काजू पिकाला जे कष्ट घ्यावे लागतात त्या पेक्षाही कमी मेहनतीत अननस बाग उभी होते. महत्त्वाचे म्हणजे अननस पिकाला प्राण्यापासून कोणताही धोका नाही. वातावरणातील बदलाचा काजू पिकावर जसा परिणाम होतो. तसा अननस बागेवर जास्त व कमी अतिवृष्टी तसेच वातावरणातील बदल याचा कोणताही परिणाम होत नाही. तालुक्यातील युवकांना जर या अननस बागायतीकडे उतरायचे असेल तर त्यांनी कमी क्षेत्रात लागवड नकरता जास्त क्षेत्रात करावी. कारण आर्थिक बजेट वाढवायचे असेल तर अननस शेती महत्त्वाची आहे, असे आवाहन करत आवश्यक मार्गदर्शन व जिल्हा बँकेकडून कर्ज देण्यास त्यांनी पुढाकार दाखविला आहे.

चाैकट

केरळवासीयांचा प्रस्ताव धुडकावला

दहा वर्षांपूर्वी केरळ येथून काही उद्योजक दळवी यांच्याकडे आले होते. अननस बागेसाठी भाडेतत्तावर तुमची जमीन द्या असा प्रस्ताव त्यांनी दळवी समोर ठेवला होता. मात्र आपली जमीन परराज्यातील व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देणे दळवी यांच्या तत्त्वात बसत नसल्याने तो प्रस्ताव त्यांनी धुडकावला आणि स्वतः शेतीत उतरले.

संदेश देसाई.

(लेखक लोकमतचे दोडामार्ग तालुका प्रतिनिधी आहेत.)

27 Annus 01

27 Annus 02

27 Annus 03

27 Annus 04

Web Title: Prosperity from pineapple farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.