टोलबाबतचा प्रस्ताव अमान्य
By Admin | Updated: August 28, 2014 00:10 IST2014-08-28T00:05:25+5:302014-08-28T00:10:18+5:30
कृती समितीची बैठक : मंत्र्यांचा निषेध; उपरा कोण हे मंत्र्यांनी जाहीर करावे

टोलबाबतचा प्रस्ताव अमान्य
कोल्हापूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोलमधून एम एच ०९ वाहने वगळण्याचा ठेवलेला प्रस्ताव सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीने आज, बुधवारी बैठक घेऊन अमान्य केला. ‘टोल पंचगंगेत बुडवू’, असे लेखी देणाऱ्या या दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापूरच्या जनतेची फसवणूक केल्याने त्यांचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे होते.
दोन्ही मंत्र्यांनी १६ जानेवारी २०१४ रोजी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले उपोषण सोडविण्यासाठी टोल रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्र्यांना अपुरी माहितीही दिली. आता फक्त एम एच ०९ नंबरच्या वाहनांना टोलमधून वगळण्याचा घाट घातला जात आहे.
कृती समिती हा पर्याय कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही, असे कृती समितीतर्फे निवास साळोखे यांनी जाहीर केले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या भूमिपूजन समारंभात उपऱ्यांनी आम्हास शिकवू नये, असे वक्तव्य केले होते. याबाबतही मंत्र्यांनी नावासह खुलासा करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
बैठकीला रामभाऊ चव्हाण, संभाजी जगदाळे, भगवान काटे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, हिंदुराव शेळके, आदीं कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)