हत्तींप्रश्नी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव द्यावा
By Admin | Updated: December 3, 2014 00:24 IST2014-12-03T00:17:25+5:302014-12-03T00:24:17+5:30
धनंजय महाडिक : चंदगड, आजऱ्यातील उपद्रवाकडे वेधले लक्ष

हत्तींप्रश्नी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव द्यावा
कोल्हापूर : हत्तींच्या उपद्रवप्रश्नी येत्या तीन आठवड्यांत तज्ज्ञ समिती चंदगड, आजरा तालुक्याला भेट देवून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वनअधिकाऱ्यांशी चर्चा करावे, हत्तींना घनदाट जंगलात सोडण्यासंबंधी राज्य शासनाने प्रस्ताव केंद्राकडे द्यावा, असे निर्णय झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
नवी दिल्लीत आज, मंगळवारी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत खासदार महाडिक यांनी आजरा, चंदगड तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवाकडे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय झाला.
आजरा, चंदगड तालुक्यांत हत्तींचा उपद्रव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. जिवित आणि वित्त हानी होत आहे. यावर खासदार महाडिक यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. पाठपुराव्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला खासदार महाडिक, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, वन्यजीव विभागाचे महासंचालक एस. एस. गर्बियाल, सहायक महासंचालक विनोद रंजन, विशेष महानिरीक्षक एस. के खंडुरी, राज्याचे मुख्य वन संरक्षण सर्जन भगत आदीउपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हत्तींचा वावर आहे. यामधील दोन नर हत्तींना बेशुध्द करून संरक्षित जंगल क्षेत्रात सोडावे. मादी हत्तीला तिलारी अभयारण्यात सोडावे, असा प्रस्ताव यापूर्वीच वनविभागाकडे दिला होता. या प्रस्तावावर चर्चा करून ३५ लाख रूपये निधी बैठकीत मंजूर करण्यात आला. ऊस, भात, बांबू, केळी, नारळ, पिकांचे हत्तींकडून नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)