पणन मंडळामार्फत नाचणी खरेदीचा प्रस्ताव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:17+5:302021-05-12T04:25:17+5:30

कोल्हापूर : नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधार किंमत मिळण्यासाठी पणन मंडळामार्फत खरेदीचे मोहीम राबविण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव तयार करावा. ...

Proposal to purchase Nachani through marketing board | पणन मंडळामार्फत नाचणी खरेदीचा प्रस्ताव करा

पणन मंडळामार्फत नाचणी खरेदीचा प्रस्ताव करा

कोल्हापूर : नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधार किंमत मिळण्यासाठी पणन मंडळामार्फत खरेदीचे मोहीम राबविण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर खते आणि बियाणांचे लिंकिंग होणार नाही, याबाबतही दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी केली.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री पाटील सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपसंचालक भाग्यश्री पवार उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, खते, बियाणे, युरिया वेळेवर मिळण्याबाबत नियोजन करा. आमदार लाड यांनी सोयाबीनचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे असे सुचवले. आमदार राजेश पाटील यांनी खताचा बफरस्टॉक झाला तर शेतकऱ्यांच्या बांधावर खते देणे सोयीस्कर होईल, असे मत मांडले. बजरंग पाटील म्हणाले, तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करून शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती द्यावी. चहा, कॉफी उत्पादनाबाबतही नियोजन करून त्याचीही माहिती शेतकऱ्यांना द्यावी.

आमदार ऋतुराज पाटील यांनी ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला दर व ग्राहकाला ताजा भाजीपाला मिळत आहे. आपल्या गावातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ओळखपत्र द्यावे.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पणन मंडळामार्फत भात खरेदीची मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. त्याच धर्तीवर ऊस पिकात आंतरपीक घेणाऱ्या नाचणीसाठीही मोहीम राबविल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, शिवाय जनावरांना वैरणही उपलब्ध होईल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी पर्जन्यमान, उत्पादन, खते व बियाणे, खरिपाकरिता बियाणे मागणी व गरज, खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा, शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे‍ मिळण्याकरिता गुणवत्ता नियंत्रण, मृदा आरोग्य पत्रिका, पीककर्ज वाटप, पीकविमा योजना याबाबत माहिती दिली.

--

फोटो नं ११०५२०२१-कोल-खरीप बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

--

Web Title: Proposal to purchase Nachani through marketing board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.