दिनकर साळुंकेंच्या नावाचा प्रस्ताव
By Admin | Updated: December 9, 2014 00:58 IST2014-12-09T00:49:27+5:302014-12-09T00:58:11+5:30
शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू निवड प्रक्रिया

दिनकर साळुंकेंच्या नावाचा प्रस्ताव
कोल्हापूर : कुलगुरू निवड समितीवर शिवाजी विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या एका व्यक्तीच्या निवडीसाठी डॉ. दिनकर साळुंके यांच्या नावाचा प्रस्ताव विद्यापीठाने राजभवनाकडे पाठविला आहे.
विद्यमान कुलगुरू डॉ. पवार यांची मुदत दि. २५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्याच्या सहा महिने आधी नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू व्हावी, असे संकेत आहेत. मात्र, त्याबाबत निवडणुका, आचारसंहिता आदींमुळे काहीच हालचाली झाल्या नव्हत्या. पण, कुलगुरू डॉ. पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आपली विद्यापीठातील मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार असल्याचे कुलपती कार्यालयाला कळविले होते. त्यावर दि. ३१ आॅक्टोबरला राजभवनातून कुलगुरू निवडीसाठीच्या समितीसाठी विद्यापीठ प्रतिनिधींचे नामनिर्देशन करा, या आदेशाचे पत्र पाठविले. त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४, कलम १२ (१) (ए) आणि (सी) मधील तरतुदीनुसार प्रतिनिधींचे नामनिर्देशन करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांची संयुक्त बैठक झाली. त्यात दिल्लीतील रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (आरसीबी)चे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर मश्नू साळुंके आणि नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे (निरी) संचालक डॉ. एस. आर. वाटे यांची नावे सूचित केली. त्यातील डॉ. साळुंके यांनी याबाबतचे स्वीकृतीपत्र विद्यापीठाला पाठविले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावाचा प्रस्ताव विद्यापीठाने राजभवनाकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)