सर्किट बेंचचा प्रस्ताव येत्या कॅबिनेटपुढे
By Admin | Updated: April 13, 2015 00:04 IST2015-04-12T22:34:59+5:302015-04-13T00:04:07+5:30
चंद्रकांतदादा पाटील : विधी व न्याय विभागाच्या त्रुटींची पूर्तता

सर्किट बेंचचा प्रस्ताव येत्या कॅबिनेटपुढे
कोल्हापूर : येथील सर्किट बेंचबाबत विधी व न्याय विभागाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता केली असून, येत्या कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली.
कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत सरकारच्या पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत, याबाबत विचारणा केली असता मंत्री पाटील म्हणाले, अधिवेशनात हा निर्णय घेण्यात येणार होता; पण काही अडचणी होत्या. विधी व न्याय विभागाने जागेबाबत काही त्रुटी काढल्या होत्या, त्यांची पूर्तता केली आहे. त्यानंतर या विभागाने जागा व कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्किट बेंचबाबत सकारात्मक असून येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागला आहे. वकिलांनी संयमाने घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, संघटनमंत्री बाबा देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, नाथाजी पाटील उपस्थित होते.
सर्किट बेंचबाबत शासनाची हमी
अन्यत्र कोठेही सर्किट बेंचची मागणी होणार नाही, अशी हमी सरकारने दिल्यानंतर विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे. तशी हमी सरकारने दिल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.