शिवराज लोंढे -- सावरवाडी -गेल्या ३५ वर्षांपासून पूर परिस्थितीला जनतेला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे विस्कळीत होणारे जनजीवन, ग्रामीण दळणवळणाचा अभाव, लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष, वाहतुकीची होणारी कोंडी या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० गावांच्या दृष्टिकोनातून कसबा बीड ते महे (ता. करवीर)दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याचा नव्याने उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. राज्य शासनाने सन १९७५ साली कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारला. सुमारे ७ लाख रुपये खर्च केले होते. मुळातच या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याची तुंब आरे, कसबा बीड, महे या गावापर्यंत येते.पावसाळ्यात या बंधाऱ्यावरून पुराचे पाणी तब्बल १५ ते २० दिवस जात असते. परिणामी करवीर पश्चिम भागातील ४० गावांची वाहतूक ठप्प होते. ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत आहे. या बंधाऱ्यावरून करवीर पश्चिम भागाची वाहतूक असते, पण बंधाऱ्याच्या उंची वाढविण्याकडे लोकप्रतिनिधी व आमदार यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुख्य दळणवळणाचा प्रश्न कित्येक वर्षे ऐरणीवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा बीड, महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याची जनतेची मागणी होत असताना आमदार, खासदारांनी दुर्लक्ष केल्याने जनतेमध्ये नाराजी होत आहे. करवीर पश्चिम भागातील गेल्या कित्येक वर्षांपासूनचा दळणवळणाचा स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडानंतर प्रश्न सुटलेला नाही. पावसाळा पूर परिस्थितीत जनतेचे होणारे हाल आणि पर्यायी उड्डाण पुलाचा रेंगाळलेला प्रश्न मात्र अद्याप निकालात निघालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याचे घोंगडे भिजत पडल्याने पावसाळ्यात जनतेचे हाल होत आहेत. बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कसबा बीड ते महे दरम्यान बंधाऱ्याच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे रेंगाळलेला आहे. शासकीय फंड लावून उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोक चळवळ उभी करावी लागणार.- राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्यकसबा बीड ते महे (ता. करवीर) दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
कसबा बीड ते महे बंधाऱ्याचा प्रस्ताव लालफितीत
By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST