तारेवाडी बंधाऱ्यानजीक पर्यायी पुलाचा प्रस्ताव

By Admin | Updated: December 9, 2014 23:22 IST2014-12-09T21:16:16+5:302014-12-09T23:22:16+5:30

बारमाही सुरक्षित वाहतूक : नाबार्डकडून मंजुरीची प्रतीक्षा

Proposal of alternative bridge at Tarewadi Bond | तारेवाडी बंधाऱ्यानजीक पर्यायी पुलाचा प्रस्ताव

तारेवाडी बंधाऱ्यानजीक पर्यायी पुलाचा प्रस्ताव

राम मगदूम - गडहिंग्लज -तारेवाडी-हडलगे दरम्यानच्या धोकादायक वळणावरील घटप्रभा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पर्यायी नवीन पुलाचा आराखडा बांधकाम खात्याने तयार केला आहे. वाहतुकीसाठी बारमाही सुरक्षित असणाऱ्या या पुलासाठी चार कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यास नाबार्डकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे.
२००१-२०२१ च्या रस्ते विकास योजनेमधील आजरा-किणे-नेसरी-कोवाड हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या मार्गावरील तारेवाडीवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूस नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करून महिन्यापूर्वीच अहवाल सादर केला आहे.
नवीन पूल सध्याच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील बाजूच्या बैलगाडी मार्गास जोडणारा आहे. नदीवर काटकोनात बांधल्या जाणाऱ्या या पुलावरील दोन पदरी रस्त्यामुळे सध्याचे धोक्याचे वळण निघण्यास मदत होणार आहे. या पुलास जोडून तारेवाडीच्या बाजूस ८० मीटर, तर हडलगेच्या बाजूस २८८ मीटर लांबीचे रस्ते होतील. दोन-तीन मीटरवरच पाया मिळणार असल्यामुळे या पुलाचा पाया भक्कम होणार आहे. (उत्तरार्ध)

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थळपाहणी
५ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीन पुलाच्या आराखड्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित पुलाच्या स्थळाची पाहणी केली. या पथकामध्ये संकल्पचित्र मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. डी. टी. ठुबे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. रामगुडे, कोल्हापूर दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता जी. टी. पोवार, गडहिंग्लज उपविभागाचे उपअभियंता एस. बी. उत्तुरे यांचा समावेश होता.


‘नाबार्ड’च्या यादीत तारेवाडीचा समावेश
नाबार्ड-२० च्या पायाभूत सुविधा अंतर्गत मंजूर कामांच्या यादीत तारेवाडी पुलाचा समावेश आहे. प्रस्तावित पुलासाठी प्राथमिक पाहणी व स्थळपाहणी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचा प्रारूप आराखडा तयार केला असून त्यास संकल्पचित्र मंडळाची मंजुरीदेखील मिळाली आहे.


महापुरातही वाहतूक सुरळीत
रस्त्याच्या पातळीपेक्षाही सखल भागात असणारा सध्याचा बंधारा दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतूक अनेकदा खंडित होते. नवीन पूल उच्चत्तम पूरपातळीपेक्षाही अधिक उंचीवर बांधणार आहे. त्यामुळे महापुराच्या काळातही या मार्गावरील वाहतूक चालू राहणार आहे.

नवीन पुलास लवकरच मंजुरी
प्रस्तावित तारेवाडी पूल प्रकल्पाच्या छाननीसाठी गुरूवार (११) रोजी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पुणे येथे होत आहे. या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंदाजित निधीच्या अंदाजपत्रकीय तरतुदीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. चालू हिवाळी अधिवेशनात या पुलास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Proposal of alternative bridge at Tarewadi Bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.