बाराशे तहसीलदारांची पदोन्नती थांबली

By Admin | Updated: June 13, 2016 00:47 IST2016-06-13T00:44:41+5:302016-06-13T00:47:30+5:30

जिल्ह्यातील २० तहसीलदार : २००५ पासून सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध न केल्याचा फटका

The promotion of twelve hundred tehsildars stopped | बाराशे तहसीलदारांची पदोन्नती थांबली

बाराशे तहसीलदारांची पदोन्नती थांबली

प्रवीण देसाई -- कोल्हापूर -राज्य शासनाने राज्यातील तहसीलदारांची ज्येष्ठता यादी २००५पासून प्रसिद्धच न केल्याने याचा फटका राज्यातील सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना बसला आहे. यामध्ये जिल्ह्यातील २० तहसीलदारांचा समावेश आहे. यादी प्रसिद्ध न झाल्याने त्यांची पदोन्नती थांबली आहे.
दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये कारकून, अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाते. तलाठ्यांची यादी, प्रांताधिकारी, नायब तहसीलदारांची, विभागीय आयुक्त व तहसीलदार-उपजिल्हाधिकाऱ्यांची यादी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडून प्रसिद्ध केली जाते. अशी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची रचना आहे. तहसीलदार वगळता उर्वरितांची यादी प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केली जात आहे. असे असताना ही यादी गेल्या ११ वर्षांपासून का प्रसिद्ध केली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पदोन्नतीसाठी ही सेवाज्येष्ठता यादी महत्त्वाची आहे; परंतु ती प्रसिद्धच न झाल्याने राज्यातील सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना याचा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २० तहसीलदारांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे त्यांची पदोन्नती थांबली आहे.
कारकून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत वेळच्या वेळी यादी प्रसिद्ध झाल्याने त्यांचा पदोन्नतीचा मार्ग सुकर झाला आहे; तर तहसीलदार ही यादी केव्हा प्रसिद्ध होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. ही यादी तत्काळ प्रसिद्ध झाली नाही तर १ जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात
आला आहे.

Web Title: The promotion of twelve hundred tehsildars stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.