कासवांच्या २५ हजार अंड्यांचे संवर्धन
By Admin | Updated: March 5, 2017 23:14 IST2017-03-05T23:14:04+5:302017-03-05T23:14:04+5:30
दापोलीत ६५ घरट्यांतून सात हजार अंडी संरक्षित

कासवांच्या २५ हजार अंड्यांचे संवर्धन
शिवाजी गोरे ल्ल दापोली
कासव संवर्धनावर वनखात्याने विशेष भर दिला असल्याने वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये २५ हजार अंड्यांचे संवर्धन झाले आहे. एकट्या दापोली तालुक्यात ६५ घरट्यांतून सात हजार अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
समुद्र व निसर्गातील समतोल राखणारा महत्त्वाचा दुवा म्हणजेच कोकण किनारपट्टीवर आढळून येणारे आॅलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव. मात्र, अलीकडे अंड्यांची होणारी तस्करी, जंगली कुत्री व हिंस्र पशूच्या आक्रमणामुळे समुद्री कासवांचा अधिवास धोक्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीची धूप, किनाऱ्यावरील वाढलेली माणसांची गर्दी हीदेखील एक समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून वनविभागाने कोकण किनारपट्टीवरील गावात कासव संवर्धन केंद्रे सुरू केली आहेत.
दापोली तालुक्यातील केळशी, आंजर्ले, पाडले, पाळंदे, लाडघर, मुरुड, कर्दे, दाभोळ, कोळथरे या नऊ गावांतील समुद्रकिनाऱ्यावर एकूण ६५ घरटी आढळून आली. या घरट्यांतील सुमारे सात हजार अंडी वनविभागाने संरक्षित केली आहेत. वेळास गावापासून कासव संवर्धन मोहिमेची सुरुवात झाली. पाच वर्षांपूर्वी या मोहिमेला अल्प प्रतिसाद होता; परंतु अलीकडे ही मोहीम गतिमान झाली. या मोहिमेच्या माध्यमातून दरवर्षी अंड्यांचे संवर्धन करून दरवर्षी हजारो पिल्ले समुद्रात सोडण्यात वनविभागाला यश आले आहे.
ज्या-ज्या समुद्रकिनाऱ्यावर कासवांचा अधिवास आहे त्या-त्या ठिकाणी वनविभागाने कासव संवर्धन केंद्र सुरू केली आहेत. या मोहिमेत दापोली तालुक्याने गरुडझेप घेतली ाहे. यात वनकर्मचारी महादेव पाटील, सहयोग कराडे, विजय तोडकर यांचेही मोलाचे योगदान आहे.
कोट
६०० पिल्ले समुद्रात सोडली
दापोली तालुक्यातील कासव संवर्धन केंद्रातील संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांची संख्या विक्रमी असून या किनाऱ्यावरील घरट्यात यावर्षी वाढ झाली आहे. आजतागायत मंडणगड तालुक्यातील वेळास ते दाभोळ या दहा गावांतील कासव संवर्धन केंद्रात ६५ घरटी आढळून आली आहेत. या घरट्यात सुमारे ७ हजार अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. आतापर्यंत ६०० पिल्ले समुद्रात सोडण्यात वनविभागाला यश आलेय.
- सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी, दापोली उपविभाग.
दाभोळ-कोळथरे, मुरुड, कर्दे या गावांत सर्वाधिक घरटी आढळून आली आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी होत आहे. कासव संवर्धन केंद्र आंजर्ले, अजिंक्य केळस्कर, लहू धोपावकर, ज्ञानेश्वर माने, मनराज नरवणकर, दत्ताराम वानरकर यांच्यासह सर्वच केंद्रांतील रक्षकांनी चांगले काम केले आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकले आहे.
- मारुती जांभळे, वनपाल, दापोली