आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार- धनंजय महाडिक यांचे स्पष्टीकरण

By Admin | Updated: September 10, 2014 23:54 IST2014-09-10T23:26:03+5:302014-09-10T23:54:39+5:30

‘कोल्हापूर’चे अस्तित्व लोकसभेत दाखविले

Promoting leading candidates - Dhananjay Mahadik's explanation | आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार- धनंजय महाडिक यांचे स्पष्टीकरण

आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार- धनंजय महाडिक यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : महाडिक गटाचा असल्याचे सांगत काहीजण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. लोकशाहीत निवडणूक लढविणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र, मी ‘कोल्हापूर दक्षिण’सह सहाही मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचाच प्रचार करणार आहे. आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
खासदार म्हणून गेल्या शंभर दिवसांत संसदेत काय कामगिरी केली त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूरचे अस्तित्व संसदेत दाखवून दिल्याचा दावा त्यांनी केला.
खासदार महाडिक म्हणाले, ‘विधानसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल, असे आतातरी वाटते. आघाडी झाल्यास माझ्या मतदारसंघातील आघाडीच्या सहा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढल्यास आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहणार आहे. उचगावचे राजू माने हे महाडिक गटाचे असले तरी ते राष्ट्रवादीचे आहेत. निवडणूक लढविणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, मी पक्षाच्या धोरणांविरोधात काहीही करणार नाही. खासदार म्हणून काम करताना गेल्या तीन महिन्यांत संसदेमध्ये ८ तारांकित आणि ५९ अतारांकित प्रश्न मांडले असून त्यावर चर्चा केली.
राष्ट्रीय, राज्य आणि कोल्हापुरातील प्रश्नांचा त्यात समावेश होता.
केंद्राच्या पातळीवरील कोल्हापूर, महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. मांडलेल्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक ‘फिडबॅक’ मिळतो. मात्र, सरकारकडून फारसे चांगले निर्णय झालेले दिसत नाही. (प्रतिनिधी)

विमानसेवेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्याच्या सर्व ‘एनओसी’ मिळविल्या आहेत. विमानाची चाचणी झाल्यानंतर कोल्हापुरामधून सेवा सुरू होईल. उद्योगपती संजय घोडावत देखील विमान सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना आवश्यक एनओसी मिळवून देण्यासाठी मी मदत करणार आहे. काहीही करून कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून महाडिक म्हणाले,‘पंचगंगा नदीची प्रदूषणमुक्ती, रंकाळा सुशोभीकरण, पासपोर्ट केंद्र, ट्रान्सपोर्टबाबतचा डॅमरेज चार्जेस, एफआरपीवर कराची आकारणी, सिमेंट दरवाढ अशा विविध प्रश्नांबाबत केंद्रातील १२ हून अधिक मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रश्न सोडवणुकीच्यादृष्टीने प्रयत्न झाले आहेत.

४६ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी
केंद्र सरकारच्या ‘सीआरएफ’ आणि ‘पीएमजेसी’ योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी एकूण २८० कोटींची मागणी केली होती. त्यापैकी ४६ कोटींच्या रस्त्यांच्या मंजुरीचे पत्र मिळाले आहे. त्यामध्ये कळे-गगनबावडा, गारगोटी, आजरा, चंदगड, कासारी नदीचा पूल, आदींचा समावेश असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
महाडिक गट शिरोलीत...
आगामी निवडणुकीत महाडिक गटाची भूमिका काय राहणार अशी विचारणा केल्यावर खासदार महाडिक यांनी ‘महाडिक गट नव्हे, राष्ट्रवादी,’ अशी दुरुस्ती केली. पक्षाच्या धोरणानुसारच आपली भूमिका असेल, असे स्पष्ट करत ‘महाडिक गट’ शिरोलीत असून, त्या गटाची भूमिका महाडिकसाहेबांनाच विचारा, असे त्यांनी हसत-हसत सांगितले.

Web Title: Promoting leading candidates - Dhananjay Mahadik's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.