प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरू

By Admin | Updated: December 18, 2014 00:10 IST2014-12-18T00:06:33+5:302014-12-18T00:10:48+5:30

कुटुंबीयांचाही सहभाग : ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार नाही

Project Stretch Stamps | प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरू

प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरू

कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, झांबरे, वारणा, चंदगड येथील प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी आज, बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या सुरू केले. विशेष म्हणजे या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी आपल्या बायको मुलांसह भाग घेतला आहे. जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ, वारणा आदी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक बैठक झाल्या, निर्णयही झाले, परंतु अंमलबजावणी काही झालेली नाही. अंमलबजावणीकरीता संबंधित सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची निर्गत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी तहसीलदार यांच्यासह तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती,परंतु त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आपले सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची अक्षरश: ससेहोलपट सुरू आहे. त्यामुळेच आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.
ठिय्या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी आपल्या बायका-मुलांसह भाग घेतला असून सोबत भांडी, लाकुडसामान आणले आहे. जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत तेथेच अन्न शिजवून खाणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व अशोक जाधव, धनाजी गुरव, मारुती राऊत, यशवंत घडाशी, के. डी. घोलप, हरी पाटील, धोंडिबा बोडके, विष्णू पेजे, धोंडिबा पोवार, रमेश पोवार, धोंडिबा पाटील आदी करत आहेत. (प्रतिनिधी)

या आहेत मागण्या...
सर्फनाला लाभक्षेत्रातील जमिनीचे आदेश व ताबा देण्यात यावा, लाभक्षेत्रातील संपादनपात्र जमीन तातडीने ताब्यात घेऊन ती सर्व प्रकल्पग्रस्तांना वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, उचंगी प्रक ल्पातील मौजे जेवूरमधील खातेदारांची ६५ टक्के रक्कम कपात करून घेतलेली नाही, ती रक्कम भरून घ्यावी, लाभक्षेत्रातील संपादन केलेली जमीन वाटपास तातडीने उपलब्ध करावी, आंबेओहोळ लाभक्षेत्रातील संपादन पात्र जमीन संपादनाची प्रक्रिया रखडलेली आहे, ती तातडीने सुरू करावी, प्रस्तावित नवीन गावठाणची निश्चिती करावी, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत.

Web Title: Project Stretch Stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.