प्रकल्प खर्च तब्बल ३०६ कोटींवर

By Admin | Updated: March 18, 2016 00:40 IST2016-03-18T00:36:05+5:302016-03-18T00:40:07+5:30

कॉमन मॅन संघटनेकडून माहिती : टोलमुक्तीसाठी आंदोलनाचा इशारा

Project cost is estimated at 306 crores | प्रकल्प खर्च तब्बल ३०६ कोटींवर

प्रकल्प खर्च तब्बल ३०६ कोटींवर

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची किंमत १९६ कोटींवरून तब्बल ३०६ कोटींवर नेला आहे, अशी माहिती येथील कॉमन मॅन संघटनेने प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे ही किंमत वाढली आहे. वाढलेल्या रकमेची वसुली टोलच्या माध्यमातून वाहनधारकांकडून केली जाणार आहे म्हणून या टोलमुक्तीच्या आंदोलनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड कंपनी एकूण ५२.६१ किलोमीटरचा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर २२ वर्षे ९ महिने टोल वसूल करणार आहे. या दरम्यान दोन उड्डाणपूल, ८२ मोऱ्या, ३२ चौक सुधारणा, २६९८ वृक्षतोड, १५ लहान पूल, १०.५७ किलोमीटरचे सेवा रस्ते, ३४ बस वे, १६ पार्किंग प्लॉट, २६ हजार ९८० नवीन वृक्षारोपण, ५५.५५ हेक्टर भूसंपादन अशी कामे आहेत.
दरम्यान, कामे वेळेत पूर्ण न झाल्याने कंपनीस दिवसाला दीड लाखांचा दंड वसूल लावला आहे. सध्या प्रकल्पाचे फक्त ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे परंतु, कंपनीकडून काम ९५ टक्के झाल्याचे सांगितले जात आहे. विलंबामुळे ३०६.९० कोटी संपूर्ण काम पूर्ण होण्यास खर्च येणार आहे. इतके पैसे कंपनी वाहनधारकांकडून टोलच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे आयआरबीप्रमाणे शासनाने या प्रकल्पाची सर्व कागदपत्रांची विशेष समिती स्थापन करून चौकशी करावी. यावर बाबा इंदूलकर, अमित अतिग्रे, स्वप्निल शिंदे, जीवन कदम यांच्या सह्या आहेत.



माहितीबाबत गोपनीयता
रस्त्याच्या माहितीसंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमालीची गोपनीयता ठेवली जात आहे. काम पूर्णत्वाबाबत कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेल्या दाव्यात मोठी तफावत आहे, अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार कंपनीने टोल वसुलीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. कामाच्या दर्जासंबंधी उपस्थित केलेले अनेक प्रश्न, वाढीव खर्च, अपूर्ण कामे असताना टोलवसुलीच्या हालचाली या अनुषंगाने हा प्रकल्पही वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत.


प्रत्यक्षात ६० टक्केही काम नाही : मिणचेकर
आंदोलनाचा इशारा : टोल सुरू करू देणार नाही
शिरोली : कोल्हापूर - सांगली रस्त्याचे प्रत्यक्षात ६० टक्केही काम झालेले नाही आणि सुप्रीम कंपनी टोलवसुलीसाठी ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा चुकीचा दावा करीत आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण झालेले शासनाचे लेखी पत्र दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार
डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. या कंपनीच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप चौपदरीकरणाचे ४० टक्के काम अपूर्ण आहे. या कंपनीला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरीही कंपनीने काम पूर्ण केलेले नाही. आता टोलवसुली करण्यासाठी कंपनी ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत आहे. परंतु, प्रत्यक्ष शासनाने काम पूर्ण झाले आहे, असे लेखी पत्र दिल्याशिवाय टोलवसुली सुरू करून देणार नाहीे, असे आमदार डॉ. मिणचेकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे, उपसरपंच राजू चौगुले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, गोविंद घाटगे, रणजित केळुसकर, हरी पुजारी, लियाकत गोलंदाज, सतीश रेडेकर, संजय चौगुले, मुकुंद नाळे, दीपक यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


टोलविरोधात रस्त्यावर उतरणार : धैर्यशील माने
आळते : कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना ‘सुप्रीम इन्फास्ट्रक्चर’ कंपनीने टोल गोळा करण्यासाठी मोठी तयारी केली आहे. कोल्हापूर शहराच्या धर्तीवर हा टोल माफ करावा; अन्यथा याविरोधात मोठा लढा उभा करून याला हद्दपार करू, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माने म्हणाले, शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांतील लोकांना याचा फटका बसणार आहे. रस्त्याचा दर्जा न तपासता टोल सुरू करण्यास मान्यता दिल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यास भाग पाडू.

Web Title: Project cost is estimated at 306 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.