कोल्हापूर : बर्ड फ्लूच्या साथीमुळे महापालिका आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. हा विषाणू स्थलांतरित पक्षांमधून पसरत असल्याने संक्रमित ठिकाणांवरून कोंबडी (पक्षी) आणणे, वाहतूक करण्याबाबत अधिक दक्षता घ्यावी. शहरात बाहेरून कोंबड्या आणण्यापूर्वी रीतसर परवानगी घ्यावे, असे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुक्कुट पालन, संबंधित व्यावसायिकांना काढले आहेत.
पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाद्य दिले जाते, अशी भांडी दररोज डिटर्जन्ट पावडरने धुवावीत. शिल्लक मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मृत झाला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. हात साबणाने वारंवार धुवा, परिसर स्वच्छ ठेवा. मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हजचा नियमित वापर करा, अशा सूचना कुक्कट पालन करणाऱ्या व संबंधित व्यावसायिकांना केल्या आहेत.
चौकट
१०० डिग्री सेल्सिअसमध्ये शिजलेले मांस खावे
पूर्ण शिजवलेल्या (१०० डिग्री सेल्सिअस) मांसाचाच खाण्यासाठी वापर करावा. आजारी दिसणाऱ्या अथवा सुस्त स्थितीत पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका. शहरात बर्ड फ्लूबाबत नियंत्रण व उपाययोजना करण्यात सर्व नागरिक, पोल्ट्री फार्म, व्यावसायिक मांस विक्रेते यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.