घटत्या उत्पादनाने भुईमुगाचा दर भिडला गगनाला
By Admin | Updated: November 27, 2015 00:06 IST2015-11-26T21:30:48+5:302015-11-27T00:06:57+5:30
गरिबांचा काजू झाला महाग : दर क्विंटलला पाच हजारांवर; पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

घटत्या उत्पादनाने भुईमुगाचा दर भिडला गगनाला
अशोक खाडे--कुंभोज -दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बागायती शेतीतील ऊस, केळी पिकांचे क्षेत्र विस्तारत आहे. तसेच वर्षभर घेतल्या जाणाऱ्या भाजीपालादी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, अनियमित पावसाळा तसेच घटत्या उत्पन्नामुळे फायद्या-तोट्याचा विचार करता भुईमूग पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. भुईमुगाचा दर क्विंटलला पाच हजारांवर गेल्याने घराघरांत प्रतिवर्षी थोड्याफार साठवणीत असणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा केवळ आता स्वयंपाकापुरत्याच उरल्याने गरिबांचा काजू जणू महाग झाला आहे.पूर्वी पाहुण्यांचा पाहुणचार चहाऐवजी गूळ-शेंगांनी केला जायचा. मुबलक भुईमूग उत्पादन असताना शेतकरी, शेतमजूर यांच्या घरी भुईमुगाच्या शेंगांचा सुकाळ असे. सर्वसामान्यही स्वयंपाकासह शेंगा भाजून खाण्याबरोबरच बियाणे, तसेच पै-पाहुण्यांना मुक्तहस्ते देत. दीपावली सणासाठी लागणाऱ्या खाद्यतेलाची भुईमुगाचा घाणा काढून गरज भागविली जाई. तथापि, अलीकडील दहा वर्षांत भूईमुगाच्या उत्पन्नात कमालीची घट होत आहे. लहान शेतकरी तर स्वत:च्या गरजेइतकेच भुईमुगाचे पीक घेत आहे, तर मोठ्या शेतकऱ्याने फायद्या-तोट्याचा विचार करून भुईमुगाचे उत्पादनक्षेत्र जाणीवपूर्वक कमी करीत आणल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. परिणामी प्रतिवर्षी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून भुईमुगाची होणारी आवक कमालीची घटली आहे. या कारणास्तव भुईमुगाचे दर वर्षानुवर्षे वाढत आहेत.
प्रतिक्विंटलला सहा हजार रुपयांवर जाऊन पोहोचलेला दर गुजरातमधील शेंगांची आवक झाल्याने पाच हजार रुपयांवर आला असला तरी तो आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत. सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांसाठीही घरी खाण्यासाठी महागड्या दराने भुईमुगाच्या शेंगा खरेदी करणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पूर्वापार खासकरून गरिबांचा काजू
समजल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या शेंगदाण्याचा वापर केवळ स्वयंपाकापुरताच होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भुईमुगाबरोबरच कडधान्याचे वर्षानुवर्षे घटत चाललेले उत्पादन पाहता कृषी विभागाने भुईमूग व कडधान्याच्या सुधारित जाती विकसित कराव्यात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांना ठरावीक पीक निश्चित क्षेत्रावर घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
- अरुण पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठवडगाव.
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या सौद्यादरम्यान भुईमूग शेंगास क्विंटलला नऊ हजार रुपये इतका विक्रमी दर निघाला, तर शेंगांचा सरासरी दर पाच हजार रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांसाठी घरात खाण्यासाठी भुईमूग खरेदी करणे आवाक्याबाहेरचे बनले आहे.
- प्रवीण देसाई, अडत दुकानदार, मिणचे.