प्रदीप शिंदे ल्ल कोल्हापूर --मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्याने तिची स्वप्नंही तशीच होती. चांगले काम करावे, सुखी संसार करावा, अशा तिच्या टिपिकल अपेक्षा होत्या; पण आयुष्यात एक असे वळण आले आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. कोल्हापूरच्या पद्मा शिंदे हिने ‘कमवा व शिका’ हा मंत्र जपत निवेदिका ते कार्यकारी निर्माती अशी झेप घेतली आहे. बाराईमाम परिसरात राहणारी पद्मा. घरची परिस्थितीही बेताचीच. दहावीच्या परीक्षेदरम्यान वडिलांचे छत्र हरपले. याही परिस्थितीवर मात करीत आई व आजीच्या पाठबळावर तिने फर्स्ट क्लास मिळवित विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मोठ्या बहिणीच्या मदतीने दोघींनीही घरी शिकवणी घेत कॉलेजचा खर्च पूर्ण केला. पदवीनंतर शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाच मुंबईतील एक वृत्तवाहिनीमध्ये काम करण्याची तिला संधी मिळाली. यावेळी अनेकांकडून ‘मुलीला एकटीला मुंबईला का पाठविता?’ अशी चर्चाही घरी सुरू झाली. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत तिने सर्व परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई गाठलीच. मुंबईत संघर्ष करीत तिने प्रथम सहायक निर्माती आणि आता एका वाहिनीत कार्यकारी निर्माती या पदापर्यंत मजल मारली. वरकरणी खूप बदललेली दिसत असले तरी आजही मी तीच जिद्दी, स्वप्नांच्या मागे धावणारी, धडपडणारी मुलगी आहे. ती तशीच राहावी अशी माझी इच्छा आहे. या प्रवासात एक गोष्ट नक्की कळलीये की, संधी कदाचित फार सहजपणे मिळू शकते; पण तिचं सोनं करण्यासाठी झिजावेच लागते. - पद्मा शिंदे
निवेदिका ते निर्माती
By admin | Updated: March 8, 2017 00:14 IST