कुरुंदवाड, तेरवाडमध्ये हत्तीवरुन मिरवणूक

By Admin | Updated: August 1, 2014 00:38 IST2014-07-31T23:37:17+5:302014-08-01T00:38:42+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेत यश : माळी समाजातर्फे साखर, पेढे वाटून आनंदोत्सव

The procession of elephants in Kurundwad and Tehawad | कुरुंदवाड, तेरवाडमध्ये हत्तीवरुन मिरवणूक

कुरुंदवाड, तेरवाडमध्ये हत्तीवरुन मिरवणूक

कुरुंदवाड : ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुरुंदवाडच्या माळी बंधूंनी वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक मिळविल्याने माळी समाजाच्यावतीने शहरात व तेरवाडमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढून साखर व पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रकुल स्पर्धेत येथील हर्क्युलस जीमचे खेळाडू गणेश माळी, चंद्रकांत माळी व ओकांर ओतारी या तिघांची निवड झाली होती. तिघांनीही कांस्यपदक मिळवून शहराचे नाव सातासमुद्रापार केले आहे. यामध्ये दोनही विजेते माळी कुटुंबातील असल्याने संपूर्ण माळी समाजाने एकत्र येऊन हत्तीवरून मिरवणूक काढत शहरात साखर व पेढे वाटप करण्याचा निश्चिय केला होता. त्यासाठी हत्तीवर कांस्यपदक विजेते गणेश माळी यांचे वडील चंद्रकांत माळी व काका श्रीकांत यांना बसविण्यात आले.
तेरवाड येथील विजेते वेटलिफ्टर चंद्रकांत माळी यांच्या मळ्यातील घरापासून ही मिरवणूक काढण्यात आली. हत्तीला सजवून तीनही खेळाडूंच्या प्रतिमेचे डिजिटल बोर्ड लावून तेरवाड व कुरुंदवाड शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पेढे व साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जीमचे प्रशिक्षक प्रदीप पाटील, संचालक अरुण आलासे, मोनाप्पा चौगुले आदींना पेढे देऊन या विजयोत्सवात सामील करून घेतले.
यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष सदाशिव माळी, प्रशिक्षक विजय माळी, धोंडीबा माळी, श्रीकांत माळी, दत्तात्रय माळी, डॉ. बाबूराव माळी, रमेश माळी, अरुण माळी, सचिन माळी, रामचंद्र माळी, रघुनाथ माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
समाजप्रेमाने भारावले माळी बंधू
कांस्यपदक विजेते गणेश माळी यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. वडील चंद्रकांत धार्मिकवृत्तीचे असून पेंटिंगचे काम करतात, तर आई दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारी करते. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी मनाने श्रीमंत आहेत. समाजाच्या प्रत्येक सुख-दु:खात हिरिरीने ते सहभागी होत असतात. यामुळे माळी समाजाने आजच्या विजयी मिरवणुकीत गणेशचे वडील चंद्रकांत व काका श्रीकांत यांनाच हत्तीवर बसवून संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली. त्यामुळे समाजाच्या या प्रेमाने चंद्रकांत माळी भारावून गेले.

Web Title: The procession of elephants in Kurundwad and Tehawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.