पासपोर्टसह मिरवणुकींची परवानगी आता मिळणार झटपट
By Admin | Updated: July 30, 2015 00:54 IST2015-07-30T00:54:03+5:302015-07-30T00:54:08+5:30
सेवा हमी कायदा : पोलीस प्रशासनाकडूनही होणार अंमलबजावणी

पासपोर्टसह मिरवणुकींची परवानगी आता मिळणार झटपट
एकनाथ पाटील - कोल्हापूर -कोणताही दाखला किंवा परवाना मिळवायचा असेल तर नागरिकांना सहा-सहा महिने पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश पोलिसांवरही बंधनकारक केल्याने नागरिकांना पोलीस ठाण्यात सर्व सेवा झटपट मिळणार आहेत. पासपोर्टपासून चारित्र्य पडताळणी दाखला, सभा, मिरवणुकीची परवानगी, हॉटेल-बार, शस्त्र परवाना, आदींचे दाखले एक महिन्याच्या आत नागरिकांच्या हातामध्ये देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांसाठी महत्त्वाच्या दाखल्यांसाठी पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांना जावे लागत असते. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे दाखला किंवा प्रमाणपत्र कोणतेही असो, त्याला किमान सहा महिने प्रतीक्षा करावी लागत असे. वशिला आणि पैसा असेल तर सहा महिन्यांचे काम दोन दिवसांत करणारी यंत्रणा पोलीस प्रशासनात गोपनीय पद्धतीने आजही सुरू आहे, परंतु सामान्य लोक या यंत्रणेमुळे भरडले जातात. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाने नागरिकांना आता पोलीस ठाण्यात सर्व सेवा झटपट देण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक कार्यालयात नागरिकांना किती दिवसांत प्रमाणपत्र द्यावे, याचा माहितीफलक लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामास प्राधान्य देऊन कागदपत्रांची पडताळणी करून मुदतीत त्यांना दाखले किंवा प्रमाणपत्रे देण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक
पासपोर्टचे काम आॅनलाईन
पासपोर्ट (व्हिसा) काढण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नागरिक मेटाकुटीला येत असतात. पासपोर्ट विभागाकडे अर्ज केल्यानंतर तो संबंधित पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी येत असतो. त्यानंतर पुन्हा तो पासपोर्ट विभागाकडे पाठविला जातो. तेथून तो पोलीस अधीक्षकांची सही होऊन पुणे विभागाकडे पाठविला जात असे. त्यामुळे वर्षभरानंतर नागरिकाच्या हाती पासपोर्ट मिळत असे, परंतु आता ही कोल्हापूर ते पुणे अशी पासपोर्टची पडताळणी आॅनलाईन सुरू केली आहे. आता स्थानिक पातळीवरही पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभाग व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे पासपोर्टचे कामकाज आॅनलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा प्रयत्नशील आहेत.