पशुचिकित्सालय ‘असून अडचण...’
By Admin | Updated: June 23, 2015 00:11 IST2015-06-23T00:11:16+5:302015-06-23T00:11:16+5:30
शिरोळ तालुका : प्रथम, द्वितीय श्रेणींतील सहा जागा रिक्त

पशुचिकित्सालय ‘असून अडचण...’
गणपती कोळी-कुरुंदवाड -शिरोळ तालुका शेतीबरोबर पशुधनातही आघाडीवर आहे. तालुक्यातील राज्य शासनाच्या पशुचिकित्सालय केंद्रातील प्रथम श्रेणीतील दोन व द्वितीय श्रेणीतील सहा जागा रिक्त आहेत. त्यामुळे केवळ चार पशुधन पर्यवेक्षक व तीन पशुधन विकास अधिकाऱ्यांवरून पशुचिकित्सालयाची सेवा सुरू असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पशुचिकित्सा सेवा मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, पर्यवेक्षक, अधिकारीविना पशुचिकित्सालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.
तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या चारही नद्यांमुळे शेतीचा विकास झाला. शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला. जागोजागी दूध संकलन करणाऱ्या पशुधनालाही प्राधान्य दिल्याने तालुक्यात पशुधनाची संख्या सुमारे लाखापर्यंत आहे. त्यामध्ये गाय आणि म्हशींचीच संख्या अधिक आहे.
तालुक्यातील पशुधन सेवा देण्यासाठी तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, विविध आजार हटविण्यासाठी लसीकरण मोहीम पशुचिकित्सालय दवाखान्यातून केली जाते. यासाठी राज्य शासनाचे प्रथम श्रेणीतील पाच, तर द्वितीय श्रेणीतील दहा दवाखाने आहेत.
द्वितीय श्रेणी दवाखान्यातून पशुधन पर्यवेक्षक काम करीत असून, दहा केंद्रांतर्गत २५ गावे येतात. मात्र, यापैकी सहा केंद्रांतील पर्यवेक्षक पद रिक्त असून, केवळ चार पर्यवेक्षकावरच २५ गावे सांभाळत आहेत. तसेच प्रथम श्रेणीतील पाचपैकी दोन जागा रिक्त असून, तीन पशुधन विकास अधिकारी काम पाहत आहेत. डॉक्टरांअभावी पशुचिकित्सालये ओस पडली असून, शेतकऱ्यांना ही सेवा वेळेवर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही सेवाच मिळत नसल्याने गावातील पशुचिकित्सालये काय कामाची असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत असल्याने गावातील पशुचिकित्सालये ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहेत. त्यामुळे तालुक्यातील या ज्वलंत प्रश्नाकडे या विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पशुसेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील रिक्त जागेबाबत वरिष्ठांना प्रत्येक महिन्याला अहवाल पाठविला जातो. मात्र, शासनाकडून अद्याप भरती केली नसल्याने पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकारी पदे रिक्त आहे. उपलब्ध अधिकारी व पर्यवेक्षकांकडून पशुसेवा दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा वेळेवर मिळण्यास अडचण होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न
चालू आहेत. - वाय. बी. पुजारी, सहायक आयुक्त,
पशुसंवर्धन अधिकारी, जयसिंगपूर.