ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:40+5:302020-12-22T04:23:40+5:30
करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खेडी स्वच्छ, समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने ...

ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न
करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खेडी स्वच्छ, समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने गाव विकासासाठी शासन लाखोंचा निधी खर्च करूनदेखील गावोगावी गटारींचा प्रश्न जैसे थे अवस्थेत राहू लागल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. प्रतिवर्षी शासनाचा ग्रामपंचायतींना येणारा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून येणारा निधी यातील बहुतांश निधीची रक्कम ही गटारी बांधकामावर खर्च केली जात असल्याचे वास्तव आहे. गावोगावी गल्लीबोळांतील गटारी बांधकाम करण्यावर वर्षानुवर्ष शासनाचा लाखोचा निधी खर्च होत असतो. गटारीमध्ये पावसाळ्यात साचलेला गाळ अगर नियमितचा पडणारा कचरा साचण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेअभावी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या गटारी जमीनीत गाडल्या गेल्या असून, त्यावरून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे अनेक ठिकाणी वास्तव चित्र आहे, तर गल्ली-बोळांतील गटारींमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने गटारींत खातीरा साचून गावोगावी दुर्गंधी पसरण्याबरोबर डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन मलेरियासारख्या जीवघेण्या आजाराचे लोक बळी ठरत आहेत. त्यामुळे खेडी स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीने गटारी बांधकामावर खर्च करण्याबरोबर स्वच्छ व वाहती गटारी राखण्यासाठी गटारी स्वच्छतेवर निधी खर्च करून गाव स्वच्छ, समृद्ध ठेवण्याची गरज आहे.
उंड्री,(ता. पन्हाळा)
फोटो : ग्रामीण भागामध्ये गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.