वाढत्या झोपडपट्टीमुळे समस्या कायम
By Admin | Updated: January 21, 2015 23:58 IST2015-01-21T23:31:21+5:302015-01-21T23:58:04+5:30
सांडपाण्याचे तीनतेरा : कमी दाबाने पाण्याचा प्रश्न, सांस्कृतिक हॉल, शौचालयांचे काम प्रलंबित

वाढत्या झोपडपट्टीमुळे समस्या कायम
कोल्हापूर : राजेंद्रनगर प्रभाग म्हणजे शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेला प्रभाग. याठिकाणी उच्च, मध्यमवर्गीयांची वस्ती देखील वाढत आहे. पाणीपुरवठा, प्रमुख रस्त्यांची झालेली चाळण या प्रमुख समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका जयश्री साबळे या यशस्वी झाल्या आहेत. मात्र, झोपडपट्टीमधील वाढत्या वस्त्यांमुळे येथील समस्या सोडविताना त्या अपयशी झाल्या आहेत, असे चित्र प्रभागात पाहण्यास मिळते. राजेंद्रनगर प्रभागात शाहू पार्क, रेव्हेन्यू कॉलनी, विजयश्री पार्क, महालक्ष्मी पार्क, डी. आर. भोसलेनगर, चिले महाराज हौसिंग सोसायटीसह राजेंद्रनगर झोपडपट्टी हे प्रमुख प्रभाग येतात. प्रभागातील प्रमुख समस्यांपैकी मोरेवाडी जकात नाका ते एस. सी. सी बोर्ड हा रस्ता अत्यंत खराब रस्ता होता. या प्रभागात खराब रस्ते असल्याने नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. जयश्री साबळे यांनी पाठपुरावा करून या प्रभागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांची कामे केली आहेत.
या प्रभागातील दुसरी समस्या होती, ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची होय. चार दिवसांतून एकदा या प्रभागात पाणी येत होते. त्यामुळे महिलावर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, साबळे यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून प्रभागात एक कोटी ६० लाख रुपयांची मुख्य पाईपलाईन टाकल्याने येथील पाण्याची समस्या सुटली आहे.
राजेंद्रनगर झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते झाले आहेत. तसेच झोपडपट्टीत २८० मोठे मर्क्युरी बल्बही बसविले आहेत. त्यामुळे लाईटची समस्या दूर झाली. मात्र, येथील सार्वजनिक शौचालय, अंतर्गत गटारींची स्वच्छता याचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच काही नागरिकांनी या ठिकाणी पाणी येत नसल्याने चार ते पाच फूट खोल खड्डे खणले आहेत. त्यामधून पाणी घेतात. मात्र, या खड्ड्यात पडून अनेकांना इजा झाल्या आहेत. नगरसेविका झोपडपट्टीमधील ठरावीक गल्लीतच विशेष लक्ष देऊन सुविधा पुरवितात. मात्र, काही गल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षित करीत आहेत, असे येथील नागरिक सांगतात.
प्रभागात ७०० घरगुती शौचालये मंजूर केली आहेत, तर राजेंद्रनगर येथे ४५ लाखांचा सांस्कृतिक हॉल उभारण्यात आला आहे. मात्र, ही कामे अजूनही प्रलंबित आहेत.
प्रदीप शिंदे
प्रभाग क्र. ७७
(राजेंद्रनगर)
प्रभागात प्रामुख्याने पाणी व रस्ते या प्रमुख समस्या होत्या. त्या मार्गी लागल्या आहेत. प्रभागातून चार बागा उभारण्याचा मानस आहे. तसेच राजेंद्रनगर येथील प्रॉपर्टी कार्ड वाटप लवकरच करण्यात येणार आहे. राजेंद्रनगर येथे काही समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- जयश्री साबळे, नगरसेविका