अनुभव चांगला नसताना पुन्हा खासगीकरण

By Admin | Updated: December 20, 2015 01:44 IST2015-12-20T01:26:19+5:302015-12-20T01:44:06+5:30

महापालिका कचरा संकलनाचा ठेका देणार

Privateization again without being good in experience | अनुभव चांगला नसताना पुन्हा खासगीकरण

अनुभव चांगला नसताना पुन्हा खासगीकरण

कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाचे खासगीकरण करण्याचा अनुभव चांगला नसताना महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुन्हा एकदा खासगीकरणाचा घाट घातला आहे. यापूर्वी दोन कंपन्यांनी घेतलेले ठेके वादग्रस्त ठरल्याने त्यांनी गाशा गुंडाळला होता. आता पुन्हा खासगी ठेकेदाराचा पालिका प्रशासनाने शोध सुरू केला असून, त्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
शहरात सध्या महानगरपालिका आपल्या स्वत:च्या यंत्रणेद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहे. त्यामुळे शहरातील कचरा दररोज उचललाही जात आहे. काही-काही वेळा कर्मचाऱ्यांची क मतरता भासते; त्यावेळीच फक्त कचरा संकलनाचे नियोजन विस्कळीत होते; त्यामुळे नागरिक आपल्या कचरा शहरात कोंडाळ्यात किंवा उघड्या जागी टाकतात. हा कचरा उठाव करण्याची महापालिकेची यंत्रणा असूनही ती प्रभावीपणे राबत नाही. त्यामुळे कचरा साचून राहण्याचे प्रकार घडत आहेत.
यावर मार्ग काढण्यासाठी कचरा संकलन खासगी ठेकेदाराकडे देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. घराघरांत जाऊन कचरा संकलन करणे आणि तो झूम प्रकल्पस्थळी नेणे असे कामाचे स्वरूप आहे. यापूर्वी दोन वेळा असा ठेका दिला होता. आदर्श घंटागाडी, नाशिक व हैदराबादस्थित रॅमकी कंपनीने शहरातील कचरा उठावाचा ठेका घेतला; परंतु त्यांच्याकडून हे काम प्रभावीपणे झाले नाही. त्यांच्या कामाबद्दल नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना निरोपाचा नारळ देण्यात आला. सध्या महापालिका स्वत:च्या यंत्रणेतून कचरा संकलन करीत असली तरी काही फेरबदल केले तर हे काम चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असा काही लोकप्रतिनिधींचा दावा आहे.
लवकरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिका कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प बीओटी तत्त्वावर सुरू करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहायचा असेल तर त्यासाठी दररोज २०० टन कचरा या प्रकल्पाला द्यावा लागणार आहे आणि सध्या महापालिका यंत्रणा तेवढा कचरा उचलू शकत नाही. म्हणूनच कचरा संकलनाचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Privateization again without being good in experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.