खासगी शाळांना हव्या आहेत पालिकेच्या इमारती
By Admin | Updated: July 28, 2014 23:18 IST2014-07-28T22:16:53+5:302014-07-28T23:18:59+5:30
पालिका शाळांतील पटसंख्या रोडावली : खासगी शाळांचा इमारतींवर डोळा

खासगी शाळांना हव्या आहेत पालिकेच्या इमारती
इचलकरंजी : शहरात खासगी शैक्षणिक संस्थांना बरकतीचे दिवस आले असून, याउलट पालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. साहजिकच शाळांच्या रिकाम्या पडलेल्या इमारती-खोल्या भाड्याने घेण्याचा सपाटा खासगी शैक्षणिक संस्थांनी चालविला आहे.
नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडे सुमारे ५० शाळा असून, त्यामध्ये सध्या अकरा हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. शहरात खासगी शिक्षण संस्थांचे प्रस्थ स्थापित होण्यापूर्वी शिक्षण मंडळाच्या शाळांतून सुमारे वीस हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करीत होते. मात्र, अलीकडील वीस वर्षांत खासगी शाळांचे पेव फुटले आणि शिक्षण मंडळाकडील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली.शिक्षण संस्थांचा व्याप वाढू लागल्यानंतर शहरात मध्यवर्ती ठिकाणी इमारती अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे खासगी शाळांची नजर शिक्षण मंडळाकडील रिकाम्या शाळा व खोल्यांवर पडली. सध्या क्रांती हायस्कूलकडे एक, डीकेटीईकडे एक व कला महाविद्यालयाकडे एक इमारत आणि नाकोडा हिंदी विद्यालयाकडे काही खोल्या भाड्याने आहेत. अशा प्रकारे अन्य ठिकाणी असलेल्या इमारती व खोल्यांवरही खासगी शाळांचा डोळा आहे.नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये नाकोडा एज्युकेशन सोसायटीला शाळा क्रमांक ६ व १३ मधील रिकाम्या सात खोल्या भाड्याने देण्याचा विषय चर्चेला येताच कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी हा विषय सभेत घेऊ, असे सूचविले. त्यावर कॉँग्रेसचेच नगरसेवक भीमराव अतिग्रे यांनी, संस्थेशी वाटाघाटी करण्यास वेळ पाहिजे का, असा खळबळजनक प्रश्न विचारला. त्यामुळे सभागृहात काही वेळ गदारोळ उडाला. तसेच ब्राह्मण समाज सभेची डेक्कन एज्युकेशन सोसायटीसुद्धा गेले सात-आठ वर्षे शाळेच्या खोल्यांची मागणी करीत आहे. आता राजकीय वजन असलेल्या संस्थांना इमारत किंवा खोल्या मिळतात. अन्य सामान्यांना लटकत ठेवले जाते, अशी चर्चा शहरात रंगली आहे. (प्रतिनिधी)
-‘मिस्त्री’ अशा नावे प्रसिद्ध असलेल्या शहरातील... मळा नावाच्या वसाहतीत एका खासगी शैक्षणिक संस्थेने काही रकमेची अनामत भरून कोणत्याही प्रकारचे भाडे न देता शाळेच्या खोल्यांचा वापर चालू केला आहे.
-त्याबाबत नगरपालिका किंवा शिक्षण मंडळ कोणतीच वाच्यता करीत नसल्याचे आश्चर्य नागरिकांतून होत आहे.
-या व्यवहारात काहींचे हात गुंतल्याचीही चर्चा आहे.