खासगी सावकारांकडे आज चौकशी होणार

By Admin | Updated: March 21, 2016 00:38 IST2016-03-21T00:28:42+5:302016-03-21T00:38:18+5:30

अमोल पवार प्रकरण : सावकारांचे धाबे दणाणले

Private lenders will be questioned today | खासगी सावकारांकडे आज चौकशी होणार

खासगी सावकारांकडे आज चौकशी होणार


कोल्हापूर : विम्याच्या ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगाराच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक यांनी कोल्हापूर शहर व उपनगरांतील बारा खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्यापैकी प्रकाश रमेश टोणपे (रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा रोड) व सतीश सूर्यवंशी (रा. गणपती मंदिराजवळ, आर. के. नगर) या दोघा सावकारांना आज, सोमवारी चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. चौकशीनंतर या दोघांच्यावर खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक दिवशी दोघा सावकारांना चौकशीच्या फेऱ्यात घेतले जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून, याप्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता १२ खासगी सावकारांकडून सुमारे तीन कोटी ६० लाख रुपये कर्ज घेतले आहे. या सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. घरी येऊनही त्यांचे गुंड त्रास देऊन धमक्या देत होते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी खासगी सावकार प्रकाश टोपणे व सतीश सूर्यवंशी या दोघांना चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठविण्यात आले आहे. सावकारांनी अमोल पवार याच्याकडून नोटरी, स्टॅम्प केलेली करारपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. परवाना नसताना बेकायदेशीर व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी संबंधित सावकारांवर खासगी सावकारकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे. या गुन्ह्यांची गुंतागुंत वाढत असून, जास्तीत-जास्त पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस करीत आहेत.


सेल्समनचा सावकार
प्रकाश टोणपे हे सुरुवातीस गांधीनगर येथे सेल्समन म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चा कटलरीचा व्यवसाय घरी सुरू केला. त्यामध्ये त्यांनी चांगलाच जम बसविला. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांनी जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवसायात पाय रोवले. त्यामध्ये भरमसाठ पैसा मिळू लागल्याने त्यांनी सावकारकी सुरू केली. त्यांचे भागात दरवर्षी वाढदिवस मोठ्याने होऊ लागले. सावकारकीतून त्यांनी अलिशान बंगला बांधल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर एका माजी मंत्र्याचा वरदहस्त असल्याने आतापर्यंत सावकारकीविरोधात कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी केले नव्हते. आता मात्र पोलिसांनी त्यांचे नाव रेकॉर्डवर आणल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी कळंबा परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Private lenders will be questioned today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.