कारागृह, वृद्धाश्रमात हास्यचळवळ रुजवणार
By Admin | Updated: January 11, 2016 01:08 IST2016-01-11T01:01:58+5:302016-01-11T01:08:01+5:30
हास्ययोग परिवार संमेलनात निर्धार : राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवार यंदा विद्यार्थ्यांनाही सामावून घेणार

कारागृह, वृद्धाश्रमात हास्यचळवळ रुजवणार
कोल्हापूर : यावर्षी शहरातील शाळा, महाविद्यालये, कारागृह, वृद्धाश्रम याठिकाणी हास्यचळवळ रुजविण्याचा निर्धार रविवारी ‘जिल्हास्तरीय हास्ययोग परिवार’ संमेलनात करण्यात आला. राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवार यांच्यावतीने हे संमेलन हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनात कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शहा, डॉ. रमाकांत दगडे व शासकीय अधिकारी ओमप्रकाश शेटे, हास्यसम्राट राहुल कुलकर्णी व नितीन कुलकर्णी यांचा विनोदी कार्यक्रम झाला.
सकाळी प्रथम व्हीनस कॉर्नर येथून ‘हास्यदिंडी व शोभायात्रे’स सुरुवात झाली. ही दिंडी कार्यक्रमस्थळी आली. त्यानंतर अध्यक्ष डॉ. दिलीप शहा यांचे ‘हास्ययोग चळवळ काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. शहा यांनी भारतात हास्य चळवळीला २० वर्षे झाली. हसण्यामुळे माणसाचे आरोग्य सुदृढ राहते. मुंबईत १३ मार्च १९९५ ला मदन कटारिया यांनी पहिला हास्यक्लब सुरू केला. आजही १०३ देशांत ही चळवळ रुजली आहे. महाराष्ट्रात सुमारे एक हजार हास्यक्लब असून, त्यापैकी जिल्ह्णात शंभर, तर शहरात ३० हास्यक्लब आहेत. हजारो रुपये खर्च करून आपल्या व्याधी कमी होत नाहीत. पण, स्वच्छ हवा मिळाल्यामुळे आपले उत्तम आरोग्य राहते. त्यातून आनंद मिळतो. हास्यामुळे संधीवात गायब होतो, रक्तदाब ताब्यात राहतो व मधुमेह होत नाही, असे सांगून हास्याचे रहस्य तरुणाईला समजावे यासाठी महाविद्यालये, शाळा, कारागृह, वृद्धाश्रमात यंदा ही चळवळ रुजवणार आहे. यानंतर ओमप्रकाश शेटे यांनी शाहूनगरीत हास्यचळवळ रुजतेय ही अभिमानास्पद बाब आहे. दुपारनंतर डॉ. रमाकांत दगडे यांचे ‘आनंदी वृद्धापकाळ’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी उपस्थित हास्यप्रेमींनी ‘हास्यक्लबने मला काय दिले?’ यावर अनुभव कथन केले. समूहनृत्याने संमेलनाची सांगता झाली. संमेलनात उपाध्यक्ष प्रफुल्ल महाजन, डी. टी. चौधरी, सी. एम. पारेख, लहू पाटोळे, डी. टी. पाटील, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)