पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:59+5:302021-08-20T04:29:59+5:30
गडहिंग्लज : जुलैमधील महापुरामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात मिळून हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या ...

पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला प्राधान्य
गडहिंग्लज : जुलैमधील महापुरामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात मिळून हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या कामालाच आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापुरामुळे निर्माण झालेल्या पुनर्वसनाच्या कामासंदर्भातील अडचणी व दिशा यासंदर्भात त्यांनी विवेचन केले, तसेच आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नदेखील मार्गी लावण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाघमोडे म्हणाले की, पुनर्वसन हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यासंदर्भातील आदेश प्राप्त होताच कार्यवाही सुरू होईल; परंतु त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पूरबाधित कुटुंबांची गावनिहाय माहिती संकलित केली जाईल.
दरम्यान, गावनिहाय बैठका घेऊन पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. अपवाद वगळता बहुतेक पूरबाधित गावात पुनर्वसनासाठी शासकीय जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जमिनी मालकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नव्या कायद्यानुसार भू-संपादनाचा मोबदला म्हणून रेडिरेकनरपेक्षा चौपट रक्कम दोन महिन्यात मिळू शकते. यासंदर्भात जनजागृती करून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वेच्छेने जमिनी देण्यासाठी खातेदार तयार व्हावेत, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
-------------------------
बाबासाहेब वाघमोडे : १९०८२०२१-गड-०६