बालवयात कौशल्यविकासास प्राधान्य द्यावे

By Admin | Updated: December 9, 2014 00:30 IST2014-12-09T00:14:46+5:302014-12-09T00:30:25+5:30

रवींद्र नाईक : श्रीमंत माईसाहेब बावडेकर जन्मशताब्दीला प्रारंभ

Prioritize skill development in children | बालवयात कौशल्यविकासास प्राधान्य द्यावे

बालवयात कौशल्यविकासास प्राधान्य द्यावे

कोल्हापूर : सर्वच क्षेत्रात अलीकडे झपाट्याने बदल होत आहेत. बदलानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम बदलणे अवघड आहे. मर्यादाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये यशस्वी होण्यासाठी बालवयातच बलस्थाने शोधून कौशल्यविकास करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ रवींद्र नाईक यांनी केले.
येथील श्री पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधीच्या श्रीमंत माईसाहेब बावडेकर जन्मशताब्दी कार्यक्रमांच्या प्रारंभप्रसंगी ते ‘मुलांमधील कौशल्य विकास’ या विषयावर बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त निधीचे अध्यक्ष माधवराजे पंडित बावडेकर, उपाध्यक्षा नीतू पंडित बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
नाईक म्हणाले, प्रत्येक मुलांमध्ये सुप्तावस्थेत काही ना काही कौशल्य असते. ते पालकांनी शोधून बालवयातच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रोत्साहनाने कौशल्याला आकार मिळतो. निरीक्षण, उत्सुकता, स्वतंत्र विचार, समस्या निराकरण, चाकोरीबाहेरचा विचार, नियोजन, लवचिकता ही सर्वसाधारणपणे कौशल्ये आहेत. यातील कोणते कौशल्य आपल्या मुलामध्ये आहे, हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, बावडेकर आणि छत्रपती घराण्याचे ३०० वर्षांपासूनचे संबंध आहेत. बाल शिक्षणामध्ये माईसाहेब बावडेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या आदर्शाने शहरात बावडेकर शाळा सुरू आहे.
संस्थेचे विश्वस्त डॉ. उद्धव पाटील यांनी श्रीमंत माईसाहेब यांचा जीवनपट छायाचित्रांसह उलगडून दाखविला. माधवराजे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक एस. डी. कुंभार, नीतू पंडित यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. नीलराजे पंडित बावडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Prioritize skill development in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.