अट्टल गुन्हेगार कळंबा कारागृहातच गिरवितात प्राथमिक धड

By Admin | Updated: July 17, 2014 00:16 IST2014-07-17T00:14:48+5:302014-07-17T00:16:23+5:30

बनतेय गुन्हेगारांचं विद्यापीठ : अनेक सराईतांची कबुली, पोलीसही चक्रावले; अंकुश ठेवणार तरी कसा ?े

The primary punishment is to get the criminals out of jail in jail | अट्टल गुन्हेगार कळंबा कारागृहातच गिरवितात प्राथमिक धड

अट्टल गुन्हेगार कळंबा कारागृहातच गिरवितात प्राथमिक धड

एकनाथ पाटील - कोल्हापूर
खून, चोरी, चेन स्नॅचिंग कसे करायचे, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांची फिरकी कशी घ्यायची, न्यायालयात कसे बोलायचे, आपले नेटवर्क वाढविण्यासाठी परजिल्ह्यांतील गुन्हेगारांशी कसा संपर्क ठेवायचा, याचे धडे आता नवख्या गुन्हेगारांना कळंबा मध्यवर्ती कारागृहात मिळत आहेत. त्यामुळे हे कारागृह ‘गुन्हेगारांचे विद्यापीठ’ म्हणून ओळखले जात आहे.
धडे देणारे दुसरे-तिसरे कोणी नसून गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले ज्येष्ठ कैदी शिक्षकाची भूमिका निभावत आहेत. पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांनी याची कबुली दिल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत.
१९९१ मध्ये या कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा देण्यात आला. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, घरफोडी, अपहरण, खंडणी, आदी विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या कैद्यांना या कारागृहात ठेवले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणचे सुमारे १७८० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह पसरलेले आहे. येथील सर्वसोयीनियुक्त११ बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात येते.
याठिकाणी शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांच्यात चांगले परिवर्तन घडावे, यासाठी कारागृह प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून कळंबा कारागृहातील वातावरण पूर्णपणे बदलल्याची चर्चा आहे. या ठिकाणी कैद्यांमध्ये दोन गट पडले असून, त्यांच्यात वर्चस्ववादातून अनेकवेळा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. गल्लीत, चौकात भाईगिरी दाखविणारे कैदी आता कारागृहातही आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. या ‘दादा’, ‘भार्इं’ना कारागृहातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. बरॅक बदलण्यापलीकडे कारागृह प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही.
काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी शहरात खून, घरफोडी, अपहरण, लूटमार प्रकरणातील काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कारागृहात राहून आम्ही एकमेकांचे मित्र बनल्याचे व त्यानंतर बाहेर पडल्यानंतर एकमेकांशी संपर्क साधून पुन्हा गुन्हे केल्याची कबुली दिली.
चोरी कशी करायची, पोलिसांनी पकडल्यानंतर पोलिसांचीच फिरकी कशी घ्यायची, याचे सर्व शिक्षण कळंबा कारागृहात अनुभवी कैद्यांकडून मिळते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींची भेट कारागृहात होत असल्याने त्यांचे नेटवर्क पक्के बनते. त्यामुळे किरकोळ आरोपी हा कारागृहातून बाहेर पडताना अनुभवी डिग्री घेऊनच बाहेर पडत आहेत.

४१९९१ मध्ये कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा
४सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह पसरलेले
४सुमारे १७८० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत
४येथील ११ बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात येते
४कैद्यात सध्या दोन गट पडले असून, त्यांच्यात वाद
४ बरॅक बदलण्यापलीकडे त्यांच्यावर कारवाई नाही

कारागृहात कैद्यांमध्ये दोन गट नाहीत. काही असंतुष्ट कैदी कारागृहाची विनाकारण बदनामी करत आहेत. कैदी एकत्र आल्यानंतर त्यांच्यात जे काही बोलणे होते ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही.
- सतीश सोनवणे,
वरिष्ठ कारागृह अधिकारी

Web Title: The primary punishment is to get the criminals out of jail in jail