निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच 'आजारी'
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T00:01:48+5:302015-07-25T01:13:31+5:30
नऊ पदे रिक्त : २२ गावांतील रुग्णांची गैरसोय

निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच 'आजारी'
चंद्रकांत पाटील - गगनबावडा -तालुक्यातील निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे आजारी पडण्याच्या स्थितीत आहे. हा तालुका दुर्गम व डोंगराळ असून, येथे कोणतीही अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारा एकही मोेठा दवाखाना उपलब्ध नाही. त्यामुळे येथील परिसरातील सुमारे २२ गावांतील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र निवडेचा आधार घ्यावा लागतो. अधिकारी, कर्मचारी यांची एकूण मंजूर पदे २२ असताना यातील केवळ १३ पदे भरलेली आहेत. नऊ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य केंद्रात निवडे केंद्राचा पहिल्या दहामध्ये क्रमांक लागतो. मात्र, अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राचेच आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. उपकेंद्र किरवे येथील आरोग्यसेविकेची सेवानिवृत्ती जवळ आल्याने त्या सतत रजेवर जात आहेत व तेथील कंत्राटी आरोग्यसेविका गेली तीन महिने प्रसूती रजेवर आहेत. या उपकेंद्राचा कारभार उपकेंद्र मणदूर येथील आरोग्यसेविकेकडे दिला आहे. त्यासुद्धा दीर्घ मुदतीच्या प्रसूती रजेवर गेल्या आहेत. एकूणच कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज चालू असून, रुग्णांची मात्र गैरसोय होत आहे. स्त्री कर्मचाऱ्यांना डे-नाईट ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची पुरती दमछाक होत आहे. अतिरिक्त कामकाजांमुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच येथील लिपिक पद गेले चार महिने रिक्त असल्याने कर्मचारीवर्गाचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहेत.
गेले सहा महिने आरोग्य केंद्र निवडे येथील रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. पावसाळ्यामुळे साथीचे आजार डोके वर काढतात. अशावेळी वेळेवर उपचार झाले नाहीत, तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. पावसाळ््यात या आरोग्य केंद्राची मोठी मदत होत असते. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष देऊन रिक्त पदांची भरती तत्काळ करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.