राजारामपुरी प्रभागात ‘काँटे की टक्कर’
By Admin | Updated: October 20, 2015 00:15 IST2015-10-20T00:08:23+5:302015-10-20T00:15:26+5:30
चुलत भाऊ-बहीण आमने-सामने

राजारामपुरी प्रभागात ‘काँटे की टक्कर’
कोल्हापूर : राजारामपुरी प्रभागावर गेल्या २० वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीत कवाळे कुटुंबीयांचेच राजकीय वर्चस्व दिसून आले आहे. मात्र, यावेळी कवाळे कुटुंबीयांतीलच संदीप कवाळे हे राष्ट्रवादीकडून, तर रूपाली कवाळे या शिवसेनेकडून हे सख्खे चुलत भाऊ-बहीण एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. तसेच भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार संग्रामसिंह निंबाळकर यांनीही या प्रभागात कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येथे ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.
राजारामपुरी प्रभागाची २००५ च्या निवडणुकीत प्रभाग रचनेतील बदलामध्ये मातंग वसाहतीमधील मतांची विभागणी झाली होती. यंदा मात्र प्रभागात सर्व वसाहतींमधील मतदान एकत्र आले आहे.
माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, माजी महापौर कांचनताई कवाळे यांचे चिरंजीव व माजी महापौर कादंबरी कवाळे यांचे पती संदीप कवाळे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर रिंगणात आहेत. या कुटुंबीयाने निवडणुकांचा पूर्वानुभव व प्रभागात केलेल्या विकासकामांचा मुद्दा या जमेच्या बाजू घेऊन प्रचाराची यंत्रणा जोरदारपणे राबविली आहे.
या प्रभागातून नेताजी कवाळे यांच्या कन्या रूपाली कवाळे या शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. शिवसेनेच्या महिला संघटक म्हणून काम करत असताना त्या महिला बचत गटाद्वारेही प्रभागातील घरोघरी पोहोचल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयाकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अनुभव व वडिलांचा जनसंपर्क, तसेच नियोजनबद्ध यंत्रणेमुळे त्यांनी प्रचारात जोर लावला आहे.
या प्रभागातून गत निवडणुकीत मंगलादेवी निंबाळकर यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवून कवाळे यांना तगडे आव्हान देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. यावेळी त्यांचे चिरंजीव संग्रामसिंह निंबाळकर हे भाजप-ताराराणी आघाडीकडून या प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. संग्रामसिंह यांचा येथील स्थानिक युवकांशी चांगला संपर्क असल्याने तेही या प्रभागातील घराघरांत पोहोचत आहेत. आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून त्यांच्या राजारामपुरी पाचव्या व सहाव्या गल्लीत रस्त्यांचे कामसुद्धा सुरू झाले आहे. हीच विकासकामे पुढे करून ते मतदारांसमोर जात आहेत.
काँग्रेसकडून या प्रभागातून रूपाली पाटील या रिंगणात आहेत. रूपाली पाटील यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. प्रभागातील महिलांच्या पाठिंब्यावर त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे.
तसेच या प्रभागातील एकमेव अपक्ष उमेदवार प्रशांत अवघडे हे भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविलेल्या विविध शासकीय योजनांच्या आधारावर मतदारांसमोर पोहोचले आहेत. (प्रतिनिधी)