दामदुपटीच्या नादात घामाचे दामही गेले
By Admin | Updated: November 8, 2014 00:26 IST2014-11-08T00:09:18+5:302014-11-08T00:26:17+5:30
‘पर्ल्स’चा घोटाळा : रिअल इस्टेट, चेन मार्केटिंग क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्यांचा फास

दामदुपटीच्या नादात घामाचे दामही गेले
संदीप खवळे - कोल्हापूर --विविध योजनांखाली दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांकडून ठेवींच्या रूपात पैसे गोळा करण्याच्या धंदा जिल्ह्यात अनेक कंपन्यांनी सुरू केला आहे़ रिअल इस्टेट, चेन मार्केटिंग क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्यांचा निरक्षर, आर्थिक ज्ञान नसलेल्या लोकांच्या गळ्यात दामदुपटीचा फास टाकण्याचा हा धंदा गेल्या काही वर्षांत फोफावला आहे़ ‘पर्ल्स’ कंपनीचा घोटाळा उजेडात आल्यामुळे ‘दामदुप्पट राहिली, आता घामाचे दाम जरी मिळाले तरी पुष्कळ’ अशीच भावना गुंतवणूकदारांमधून व्यक्त होत आहे़ रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आपल्या व्यवसायासाठी भांडवल गोळा करण्याच्या नावाखाली हा पैसा गोळा करीत आहेत. बँकांच्या तुलनेत अधिक आणि कमी कालावधीत व्याज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना पैसे गुंतविण्यास उद्युक्त करणारी एक भली मोठी फळीच जिल्ह्यात कार्यरत आहे़ एकट्या ‘पर्ल्स’च्या जिल्ह्यातील अधिकृत एजंटांची संख्या ४० हजारांच्या घरात आहे़ सोडून गेलेले एजंट वेगळेच़ पर्ल्सव्यतिरिक्त आणखी काही कंपन्यांनीही जिल्ह्यामध्ये दामदुप्पट योजनेसाठी प्रतिनिधी नेमले आहेत़ यापैकी काही कंपन्या ठेवीदारांचा पैसा पशुपालनाशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतवीत आहेत.शिक्षणाची अट नाही, अनुभवाची अट नाही, तरीही आकर्षक कमिशऩ सुस्थापित विमा कंपन्याच्या एजंटापेक्षाही जास्त कमिशन, जास्त व्यवसाय दिल्यास वरच्या पदावर प्रमोशन, परदेश वारी, गाडी, अशी एक ना अनेक आमिषे़ त्यामुळे जादा पैसे मिळविण्याच्या मोहात पडलेले एजंट इतरांनाही या जाळ्यात ओढून घेतात़ मग तयार होते ती एक साखळी़; पण या साखळीत बिचारा गुंतवणूकदार मात्र पुरता भरडून जातो़ गोरगरीब शेतकरी, कष्टकरी महिला, छोटे व्यावसायिक, वृद्धापकाळात काम करणारे निवृत्त नागरिक व हजारो नागरिक एजंट म्हणून या व्यवसायात कार्यरत आहेत.नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या युवकांनाही या जाळ्यात अलगद ओढले जात आहे़
पर्ल्समध्ये काम करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे़ यातील अनेक महिलांची परिस्थिती बेताची आहे़ चार पैसे मिळावेत म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला अन् आता पायांखालील वाळूच सरकण्याची वेळ आली आहे़
पर्ल्सच्या या जंजाळात सापडलेल्या पासष्टीतील चित्रा जाधव असोत किंवा तिशीतला सचिन पाटील असो़़़ चेन मार्केटिंग, जनरेशन प्लॅन यांसारखा मार्केटिंग तंत्राचा मागमूसही त्यांना नाही़ केवळ अमुक लोकांकडून तुम्ही इतकी ठेव आणली तर तुम्हाला इतके कमिशन मिळते़़ तशीच परिस्थिती गुंतवणूक करणाऱ्याची़ कॉर्पोरेट दुनियेच्या या भामटेगिरीची त्यांना कल्पनाच नाही़ ‘आता भार आमचा शासनाच्या डोई,’ अशीच ठेवीदारांची अवस्था झाली आहे़
भागभांडवलाच्या नावाखाली गोळा करतात पैसा
बँके च्या तुलनेत अधिक
व्याजाचे आमिष
पर्ल्सशिवाय जिल्ह्यात आणखी काही कंपन्या कार्यरत