सोयाबीनचा दर दहा हजार, शेतकऱ्यांच्या हातात सहाच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:56+5:302021-09-09T04:30:56+5:30

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि अतिवृष्टी, महापुराचा फटका बसल्याने कमी झालेले उत्पादन यामुळे ...

The price of soybean is ten thousand, six thousand in the hands of farmers | सोयाबीनचा दर दहा हजार, शेतकऱ्यांच्या हातात सहाच हजार

सोयाबीनचा दर दहा हजार, शेतकऱ्यांच्या हातात सहाच हजार

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि अतिवृष्टी, महापुराचा फटका बसल्याने कमी झालेले उत्पादन यामुळे सोयाबीनच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कधी नव्हे इतक्या १० हजार रुपये क्विंटल असा दराने ऐतिहासिक टप्पा गाठला आहेे. शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडण्याची चिन्हे असतानाच व्यापाऱ्यांकडून आर्द्रता, काडीकचरा, गुणवत्ता, असे निकष लावून शेतकऱ्यांच्या हातात क्विंटलला सहा हजार रुपयेच टेकवले जात आहेत.

गेल्या वर्षी खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर चढू लागले आहेत. अडीच हजारांवर असणारा दर एकदम दीड हजाराने वाढत ते ३९०० ते ४३०० इतका झाला. हंगाम पुढे सरकेल, तसे दर वाढतच गेले. उन्हाळी हंगामात ७ ते ८ हजार रुपये उच्चांकी भाव झाला. साहजिकच खरिपात सोयाबीनच्या पेरणीकडे कल वाढला. पीक क्षेत्र वाढल्याने दरात कमी येईल, असा कयास बांधला जात होता. तथापि, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. नदीकाठचे तर सोयाबीन कुजून गेले. माळरानावरचे सोयाबीन तरले; पण पाऊस ओसरल्यानंतर तांबेरा, करपा, पाने खाणाऱ्या अळीसह तुडतुडे माव्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केल्याने सोयाबीन पिकावर औषध फवारण्या वाढवाव्या लागल्या. लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून गेल्या दीड- दोन वर्षांत कीटकनाशकांच्या किमती दुपटी, तिपटीने वाढल्या आहेत. एका गुंठ्याचा फवारणीचा खर्च १५० ते २०० रुपये होत आहे. शिवाय आंतरमशागतीसह कापणी, मळणीचा खर्चही गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी हा खर्चही पेलला; पण प्रत्यक्षात विक्री सुरू झाल्यावर व्यापाऱ्यांकडून लूट सुरू झाली आहे. हवा जास्त आहे, काडीकचरा आहे, असे सांगत दरात कपात केली जात आहे, तसेच काटामारीही वाढली आहे. दर दहा हजार असल्याचे सांगितले जात असलेतरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सहा ते सात हजारच हातावर टेकवले जात आहेत. उघडपणे सुरू असलेल्या या लुटीची तक्रार करायची, तर कोणाकडे करावी, या संभ्रमावस्थेत उत्पादक आहेत.

सोयाबीनचे वाढत गेलेले दर (क्विंटलमध्ये)

वर्ष दर

सप्टेंबर २०१८ १९००

सप्टेंबर २०१९ २५००

सप्टेंबर २०२० ३९००

एप्रिल २०२१ ७०००

सप्टेंबर २०२१ १००००

चौकट

जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र : ४० हजार ४७८ हेक्टर

सरासरी उत्पादकता : एकरी सरासरी ८ ते १० क्विंटल

मिळणारा दर : ५ ते ७ हजार

एकरी उत्पादन खर्च : २५ ते ३० हजार

चाैकट

मार्केटिंग फेडरेशन सूचनेच्या प्रतीक्षेत

किमान आधारभूत किमतीच्या वर सोयाबीनचे दर गेल्याने यावर्षी मार्केटिंग फेडरेशनचे काही काम उरलेले नाही. तसे दरवर्षीही त्यांना नसतेच. किमान हमीभावापेक्षाही कमी दराने गेल्या वर्षीच्या खरिपात सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांकडून होत होती, तरीदेखील फेडरेशनने केंद्र सुरू करायची तसदी घेतली नाही की, कारवाई केली नाही. यावर्षी तर दर वाढल्याने फेडरेशनचा विषयच संपला आहे. तरीदेखील कार्यालयाकडे विचारणा केल्यावर सरकारच्या सूचना आल्यावर पाहू, असे उत्तर देण्यात आले.

Web Title: The price of soybean is ten thousand, six thousand in the hands of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.