जांभळासारख्या दिसणाऱ्या जम्बो द्राक्षांनी खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:37+5:302021-03-27T04:24:37+5:30
कोल्हापूर : जांभळासारखाच गडद रंग, आकारही अगदा सेम टू सेम अशा जम्बो द्राक्षांनी कोल्हापुरात पहिल्यांदाच भरवलेल्या द्राक्ष महोत्सवात चांगलाच ...

जांभळासारख्या दिसणाऱ्या जम्बो द्राक्षांनी खाल्ला भाव
कोल्हापूर : जांभळासारखाच गडद रंग, आकारही अगदा सेम टू सेम अशा जम्बो द्राक्षांनी कोल्हापुरात पहिल्यांदाच भरवलेल्या द्राक्ष महोत्सवात चांगलाच भाव खाल्ला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सकाळी या पाचदिवसीय महोत्सवाच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिवसभर चोखंदळ रसिक ग्राहकांची अक्षरश: रीघ लावत नवनवीन द्राक्षांची चव चाखत खरेदीही केली.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने गोव्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात द्राक्ष महोत्सव भरविला आहे. शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मंगळवार ३० पर्यंत खरेदी करता येणार आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन झाले.
गोड चवीचे अनुष्का, जांभळासारखे दिसणारे जंबो सिडलेस, रेडग्लोब, लांबसडक बोटासारखे दिसणारे सुपर सोनाक्का, जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचे माणिकचमण, बियांशिवाय मऊ लुसलुशीत खाता येणारी म्हणून कृष्णा सिडलेस, आर.के. सुपर, शरद सीडलेस, आदी जातींची द्राक्षे महोत्सवाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी पाहायला, चाखायला मिळत आहेत. मात्र बाजारापेक्षा दर जास्त असल्याबद्दल भेट देणारे ग्राहक काहीशी नाराजी व्यक्त करताना दिसत होते. याबद्दल विक्रेते असलेल्या शेतकऱ्यांकडे याबाबत तक्रारही मांडत होते, यावर निर्यातीच्या गुणवत्तेची द्राक्षे असल्याने दर काहीसा जास्त असल्याचे स्पष्टीकरण दिले जात होते.
फोटो: २६०३२०२१-कोल-द्राक्षे ०१
फोटो ओळ : कोल्हापुरात शाहू स्मारकमध्ये भरविण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेरफटका मारून माहितीही घेतली. यावेळी ‘पणन’चे सुभाष घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो: २६०३२०२१-कोल-द्राक्षे ०२
फोटो ओळ: कोल्हापुरात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाला कोल्हापुरकरांनी पहिल्याच दिवशी प्रतिसाद दिल्याने शाहू स्मारकमध्ये अशी गर्दी दिसत होती. (छाया: नसीर अत्तार)
फोटो: २६०३२०२१-कोल-द्राक्षे ०३
फोटो ओळ : कोल्हापुरात भरलेल्या द्राक्ष महोत्सवात सोनी (ता. मिरज) येथील दिलीप पाटील, प्रतीक लेंगरे या शेतकऱ्यांची जंबो सीडलेस ही द्राक्षे विशेष आकर्षण ठरली होती. (छाया : नसीर अत्तार)