कोल्हापूर : राज्य सरकार आणि आयआरबीचे साटेलोटे असल्याचे आता स्पष्ट झाले असून, याचा फायदा घेत आयआरबीने टोल वसुलीकरिता सराईत गुन्हेगार, गुंड यांना टोल नाक्यांच्या परिसरात बाजूला उभे करून दहशतीचा प्रयत्न होत आहे. अशा गुंडांना शोधून कारवाई करावी, अशी मागणी आज सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. शाहू टोल नाक्यावर निपाणीच्या वाहनधारकाला धक्काबुक्की केली, बळजबरीने पैसे वसूल केले. या घटनेबाबत गुन्हा नोंद झाला आहे. अशा घटना अन्य नाक्यांवर होत आहेत. म्हणून या घटनांची जबाबदारी निश्चित करून आयआरबीच्या सुपरवायझरांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी केली. नाक्यांवर होणारी दमदाटी, धाकदपटशा यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणूनच वेळीच यात लक्ष घालावे, असे कृती समितीने सुचविले. कृती समितीने टोल देऊ नये, अशा आशयाचे लावलेले फलक चोरून नेल्याचे निवासराव साळोखे यांनी निदर्शनास आणून दिले. पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आयआरबीच्या १५९ कर्मचाऱ्यांना छाननी करून ओळखपत्रे दिली आहेत, त्याव्यतिरिक्त कोणी कर्मचारी काम करीत असतील तर त्यांचा शोध घेऊन कारवाई करू, असे सांगितले. प्रत्येक पोलीस ठाण्याला व्हिडिओ कॅमेरा दिला असून, त्यावर चित्रीकरण करण्यात येत आहे. गैर घडत असेल तर त्यांना लगेच नोटीस देऊ. आतापर्यंत आठ ते दहा नोटिसा दिल्या आहेत, असेही शर्मा यांनी सांगितले. शिष्टमंडळात रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत यादव, नगरसेवक सत्यजित कदम, दिलीप पोवार, सतीश कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, चंद्रकांत बराले, अजित सासने, अशोकराव साळोखे, दीपा पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
‘आयआरबी’च्या गुंडांना रोखा
By admin | Updated: July 6, 2014 00:20 IST