देवस्थानमधील धर्मविरोधी कृती रोखा
By Admin | Updated: January 11, 2016 01:08 IST2016-01-11T01:00:16+5:302016-01-11T01:08:54+5:30
राष्ट्रीय हिंदू आंदोलनची मागणी : काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी निदर्शने

देवस्थानमधील धर्मविरोधी कृती रोखा
कोल्हापूर : शनिशिंगणापूरसह इतर देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ‘पनूून काश्मीर’ द्यावे या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे रविवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
दुपारी बाराच्या सुमारास सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकवटले. घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.
काश्मीर खोऱ्यातील स्वतंत्र भारतात पाकिस्तानपुरस्कृत जिहादी दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून आक्रमणे करून अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. इतरांवर अत्याचार करून त्यांना धमकावण्यात आल्याने साडेचार लाखांहून अधिक हिंदूंना काश्मीर खोऱ्यातून सन १९९० ला विस्थापित व्हावे लागले. या घटनेला दि. १९ जानेवारी २०१६ या दिवशी २६ वर्षे पूर्ण होत आहेत. सन १९९०पासून या विस्थापित हिंदंूचे अद्याप पुनर्वसन झालेले नसून ते न्यायापासून वंचित आहेत. तरी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना ‘वंशसंहार’ म्हणून ओळखले जावे. त्या अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे ठरावीक कालमर्यादेत चौकशी करावी. या हिंदूंच्या सुरक्षित परतीसाठी स्वतंत्रपणे ‘पनून काश्मीर’ नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी.
त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथील मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथऱ्यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. सध्या सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष भक्त शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांनाच बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. हा विषय स्त्री मुक्तीचा नसून पूर्णत: आध्यात्मिक आहे तरी तथाकथित पुरोगामी संघटना धर्मातील परंपरा, रूढी आणि श्रद्धा यावर जाणीवपूर्वक आघात करत आहेत. धर्माच्या दृष्टीने हे वर्तन अयोग्य आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक धर्मविरोधी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमात इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात भारतीय संस्कृतीविषयी खोटी व अवमानकारक माहिती देणारे लिखाण केले आहे. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
आंदोलनात मधुकर नाझरे, शिवाजीराव ससे, संभाजीराव भोकरे, शिवानंद स्वामी, राजू यादव, डॉ. मानसिंग शिंदे, संजय कुलकर्णी, अंजली कोटगी, सुरेखा काकडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)