पॅनेल करण्यासाठी मुश्रीफांवर दबाव
By Admin | Updated: April 5, 2015 00:53 IST2015-04-05T00:53:08+5:302015-04-05T00:53:08+5:30
‘गोकुळ’ची निवडणूक : सोमवारी भेटीनंतर पुढील दिशा ठरवू ; कार्यकर्त्यांना आश्वासन

पॅनेल करण्यासाठी मुश्रीफांवर दबाव
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आपण आमदार महादेवराव महाडिक यांना मदत न करता सत्तारूढ आघाडीच्या विरोधात ताकदीने पॅनेल उभा करावे, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कार्यकर्त्यांनी धरला.
शुक्रवारी सायंकाळी कागलमधील अलका शेती फार्मवर मुश्रीफ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भूमिका ठरविण्यासाठी बैठक झाली. मी आमदार महाडिक यांना सोमवारी (दि. ६) व मंगळवारी लगेच माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार विनय कोरे यांंना भेटणार आहे. महाडिक काय सांगतात त्यावर पुढील दिशा ठरवू, असे मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला मदत करून जिल्हा बँकेत त्या पक्षाची मदत घेण्याचा मुश्रीफ यांचा प्रयत्न आहे; परंतु गोकुळमध्ये सत्तारूढ गटाला पाठिंबा देताना रणजित पाटील यांना सहकार्य व संजय घाटगे यांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी नको, अशी त्यांची अट आहे. रणजित पाटील यांना उमेदवारी मिळण्यात कोणतीच अडचण नाही. ती त्यांच्या स्वत:च्या राजकीय ताकदीवरही मिळते. अडचण अशी आहे की, घाटगे यांना पॅनेलमधून वगळण्याचा निर्णय महाडिक घेऊ शकत नाहीत; कारण त्यास सत्तारूढ गटाचे दुसरे नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांचा विरोध आहे.
दुसरे असे की, महापालिकेच्या राजकारणातही महाडिक गटाने महापौरांची पाठराखण केल्याने त्यांचा राजीनामा अजून झालेला नाही. आमच्या नेत्यांच्या शब्दाला महाडिक किंमत देत नसतील तर त्यांच्या पाठीमागून आपण तरी का जावे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळेच जिल्हा बँकेत काय व्हायचे ते होऊ दे, परंतु गोकुळमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधात तुम्ही पॅनेल करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांच्या भावनांची मी नक्की दखल घेईन. गेल्या आठवड्यातही महाडिक यांची भेट घेऊन जे काही सांगायचे ते सांगितले आहे. त्याचे त्यांनी काय केले हे सोमवारी त्यांना भेटल्यानंतर समजेल. त्यानंतर मंगळवारी सतेज पाटील व विनय कोरे यांना भेटून पुढील वाटचालीची दिशा निश्चित करूया, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कोण कुणाबरोबर...!
मुश्रीफ यांच्यावर सत्तारूढ आघाडीस पाठिंबा देऊ नका, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाच तोपर्यंत शनिवारी झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतही महाडिक योग्य प्रतिनिधित्व देणार नसतील, तर सतेज पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली.
त्यासंदर्भात आजच काही कार्यकर्त्यांनी जाऊन सतेज पाटील यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे यातील कोण महाडिक यांच्याबरोबर व कोण सतेज पाटील यांच्याबरोबर राहणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.