विश्वास पाटील ‘गोकुळ’चे अध्यक्ष

By Admin | Updated: May 8, 2015 00:42 IST2015-05-08T00:29:47+5:302015-05-08T00:42:25+5:30

बिनविरोध निवड : दुसऱ्यांदा मिळाली संधी; अखेरच्या टप्प्यात नरकेंचाही पाठिंबा, निवडीनंतर जल्लोष

President of 'Gokul' Trust Patil | विश्वास पाटील ‘गोकुळ’चे अध्यक्ष

विश्वास पाटील ‘गोकुळ’चे अध्यक्ष

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या अध्यक्षपदाची ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले अरुण नरके यांनीही पाटील यांनाच पाठिंबा दिला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पाटील यांची निवड बिनविरोध झाली. गुरुवारी मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली.
‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक २३ एप्रिलला झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे नेते आ. महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकत सत्ता कायम राखली. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीला दोन जागा मिळाल्या.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी अरुण नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ज्येष्ठ संचालक नरके यांनीही अध्यक्षपदासाठी दावा केल्यामुळे नेत्यांची कोंडी झाली होती. आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील या ‘दोघांनाही चालणारा चेहरा’ म्हणून विश्वास पाटील यांचे नाव बुधवारी निश्चित झाले. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये संचालकात दुफळी पडू नये आणि संघाचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी शेवटच्या टप्प्यात नरके यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वत:हून मागे होत पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे पाटील यांचा अध्यक्षपदासाठीचा मार्ग सुकर झाला.
गुरुवारी सकाळी दहा वाजता ताराबाई पार्कातील ‘गोकुळ’च्या कार्यालयात पी. एन. पाटील, आमदार महाडिक आले. दोघांनीही अँटी चेंबरमध्ये बसून १५ मिनिटे चर्चा केल्यानंतर अध्यक्षपदाच्या नावाचे बंद पाकीट नरके यांच्याकडे दिले. तेथून सर्व संचालक ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयाकडे गेले. तेथील बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम वाचून दाखविले. त्यानंतर नरके यांनी बंद पाकीट फोडले. त्यावरील असलेले विश्वास नारायण पाटील यांचे नाव नेते पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी अध्यक्षपदासाठी निश्चित केले आहे, असे नरके यांनी वाचून दाखविले. अन्य कोणी अध्यक्षपदासाठी अर्ज भरू नये, असेही नरके यांनी आवाहन केले.
अध्यक्षपदासाठी पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जास अरुण नरके सूचक, तर रणजितसिंह पाटील अनुमोदक राहिले. एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. निवडीच्या बैठकीस सर्व संचालक उपस्थित होते.


पाटील अकरावे अध्यक्ष...
‘गोकुळ’मध्ये १६ मार्च १९६३ रोजी एन. टी. सरनाईक पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर आनंदराव पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, राजकुमार हत्तरकी, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, दिलीप पाटील यांनी अध्यक्षपद भूषविले. आनंदराव पाटील यांना दोनदा अध्यक्षपदाची संधी मिळाली. विश्वास पाटील यांनी ६ डिसेंबर २००४ ते २ डिसेंबर २००६ या काळात अध्यक्ष म्हणून काम केले. पुन्हा ११ वे अध्यक्ष म्हणून पाटील यांनाच संधी मिळाली.


नूतन अध्यक्ष म्हणतात...
नूतन अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘गोकुळ’समोर ‘अमुल’सारख्या खासगी दूध संघाचे आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये कारभार पारदर्शक करून दूध उत्पादकांना चांगला भाव कसा देता येईल, त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ‘गोकुळ’ची वितरण व्यवस्था स्वत:ची असल्यामुळे सध्याच्या अडचणीच्या काळातही उत्पादकांचे दूध दर कमी केलेले नाहीत. मुंबईत संघाचा दुसरा प्रकल्प घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे होते. यापुढील काळात सर्वांना घेऊन कामकाज करणार आहे.

Web Title: President of 'Gokul' Trust Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.