जिल्हा बँक अध्यक्षपदी ए. वाय. निश्चित
By Admin | Updated: May 12, 2015 00:15 IST2015-05-12T00:15:26+5:302015-05-12T00:15:46+5:30
२२ मे रोजी होणार निवडी : उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या राजू आवळे यांना संधी

जिल्हा बँक अध्यक्षपदी ए. वाय. निश्चित
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ए. वाय. पाटील (राधानगरी) व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे राजू जयवंतराव आवळे (हातकणंगले) यांची निवड निश्चित मानली जात आहे. या दोन्ही नावांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाले असून २२ मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड होणार आहे.
जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी शिवसेना-भाजप आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. अध्यक्षपदासाठी आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ए. वाय. पाटील यांच्या नावांची चर्चा होती पण बँकेची थकीत कर्जे, आगामी दोन वर्षांत त्याची करावी लागणारी वसुली पाहता आक्रमकपणे निर्णय घेणारी व्यक्ती अध्यक्षपदावर बसवणे गरजेचे आहे. ‘दौलत’, ‘गायकवाड साखर कारखाना’ तंबाखू संघ आदी बड्या थकबाकीदारांकडून वसुलीचे शिवधनुष्य अध्यक्षांना पेलावे लागणार आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री विनय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक यांच्यात रविवारी रात्री सांगली जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांच्या कार्यालयात गुप्त बैठक झाली. त्यामध्ये आमदार मुश्रीफ यांच्यासह के. पी. पाटील, भैया माने, निवेदिता माने यांच्या नावांवर चर्चा झाली. अशा परिस्थितीत वसुली करायची म्हटले तर कार्यकर्ते दुखवावे लागणार असून, ही जबाबदारी सक्षमपणे केवळ ए. वाय. पाटील पेलू शकतात. पाटील यांनी अलीकडे पी. एन. पाटील यांच्याशीही जुळवून घेतले आहे, त्याचबरोबर विनय कोरे व संजय मंडलिक यांनीही त्यांच्या नावाला सहमती दर्शविल्याने त्यांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे.
उपाध्यक्षपदाबाबत कॉँग्रेसकडून उदयानी साळुंखे व राजू आवळे यांच्या नावांची चर्चा झाली, पण माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी ताकद लावल्याने राजू आवळे यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी २२ मे रोजी संचालक मंडळाची बैठक होत आहे. यामध्ये या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. (प्रतिनिधी)
अजितदादांकडून
‘ए. वाय.’ यांचे नाव
बँकेची सध्याची आर्थिक स्थिती व वसुलीची गरज पाहता पहिल्या वर्षी पी. एन. पाटील यांना देण्याबाबत बँक वर्तुळात चर्चा सुरू होती, पण सत्ता राष्ट्रवादीची असताना काँग्रेसचा अध्यक्ष कसा करता, अशी विचारणा थेट माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून केली व त्यांनीच ए. वाय. पाटील यांचे नाव सुचविल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
१९९५ पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत
२००४-०५ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी
विनय कोरे, महादेवराव महाडिक, संजय मंडलिक यासह सर्वांनाच चालणारा चेहरा
आमदारकीचे उमेदवार नसल्याने ते बड्या थकबाकीदारांना अंगावर घेऊन आक्रमकपणे वसुली करू शकतात.
असा आहे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’
पहिली दोन वर्षे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे
त्यानंतरची दोन वर्षे अध्यक्षपद काँग्रेस तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
शेवटच्या वर्षी अध्यक्षपद जनसुराज्य पक्षाकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे