पानसरे स्मारक आराखडा सादर

By Admin | Updated: January 18, 2017 01:04 IST2017-01-18T01:04:27+5:302017-01-18T01:04:27+5:30

महापालिका प्रशासन : तांत्रिक मंजुरीनंतर १५ दिवसांत कामास सुरुवात शक्य

Presenting the Pansare Memorial Plan | पानसरे स्मारक आराखडा सादर

पानसरे स्मारक आराखडा सादर



कोल्हापूर : डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या प्रतिभानगर येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा सुधारित आराखडा मंगळवारी महानगरपालिकेस सादर करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत आराखड्याची तांत्रिक छाननी करून १५ दिवसांत मंजुरी देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. नवीन आराखड्यामुळे स्मारकाची जागा दुपटीने वाढणार आहे.
कोल्हापुरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण तत्कालीन महापौर अश्विनी रामाणे, स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यावेळी आराखड्यात काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नवीन आराखडा तयार करावा, त्यासाठी २० लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रामाणे यांनी दिले होते.
त्यानुसार आर्किटेक्ट सावंत यांनी हा सुधारित आराखडा तयार केला. या आराखड्यात आता नव्याने ग्रंथालयाची इमारत, खुले व्यासपीठ, बैठक व्यवस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीचा आराखडा ३५ बाय ३० स्क्वेअर फुटांच्या जागेत तयार करण्यात आला होता, तो आता ७० बाय ६० स्क्वेअर फुटांच्या जागेत करण्यात आला आहे. त्यामुळे स्मारकाची जागा दुप्पट होईल. या स्मारकामध्ये संदेश देणारे तीन फलक लावले जाणार आहेत. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हे स्मारक करण्याचा सावंत यांचा मनोदय आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती सोयीची होईल, असा त्यांचा दावा आहे.
महानगरपालिकेत मंगळवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आर्किटेक्ट सावंत यांनी स्मारकाचे सादरीकरण केले. यावेळी नामदेव गावडे, गिरीश फोंडे उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर १५ दिवसांत स्मारकाचे काम सुरू होईल. साधारणपणे कामाला सुरुवात झाल्यापासून ते सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे सावंत यांनी सांगितले. जितक्या लवकर तांत्रिक मंजुरी दिली जाईल, तितक्या लवकर कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महावितरणचा अडथळा
पानसरे यांच्या स्मारकाच्या आडवे येणारा ‘महावितरण’चा ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करून दुसऱ्या जागी उभारण्यात यावा, अशी विनंती करणारी दोन पत्रे महानगरपालिकेने महावितरण कंपनीला पाठविली आहेत. त्यांना पर्यायी जागाही दिली आहे; परंतु महावितरण कंपनीने या सूचनेकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
ज्यांनी उभी हयात तळागाळातील लोकांच्या कल्याणाकरिता घालविली, अशा पानसरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणीही अडथळा आणू नये, अशी अपेक्षा असताना ‘महावितरण’ मात्र चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Presenting the Pansare Memorial Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.