मुन्सिपल हायस्कूलच्या लढाईत रक्त सांडण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:33+5:302021-07-14T04:29:33+5:30
हस्तांतरण होऊ देणार नाही, घर मोडून मांडव नको लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणीचे मुन्सिपल हायस्कूल ही निपाणीची ऐतिहासिक ...

मुन्सिपल हायस्कूलच्या लढाईत रक्त सांडण्याची तयारी
हस्तांतरण होऊ देणार नाही, घर मोडून मांडव नको
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणीचे मुन्सिपल हायस्कूल ही निपाणीची ऐतिहासिक संपत्ती आहे. निपाणीतील पूर्वजांनी ही शाळा सुरू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले. मुन्सिपल हायस्कूलला देशातील अनेक नामवंत मान्यवरांनी भेट दिली असून, याठिकाणी शिकलेले असंख्य विद्यार्थी आज विविध उच्च पदावर आहेत. अशा हायस्कूलचे सरकारला हस्तांतर करणे म्हणजे घर मोडून मांडव घालण्याचा प्रकार आहे. ही शाळा बंद पाडण्याचा हेतू नगरपालिकेचा आहे. शाळा वाचवण्यासाठी प्रसंगी रक्त सांडू व न्यायालयीन लढाई लढू, पण हे हस्तांतरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केले.
निपाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. या सभेसमोर असलेल्या २६ विषयांपैकी मुन्सिपल हायस्कूलचे सरकारला हस्तांतरण करणे हा एक विषय होता. हा विषय सभागृहात मंजूर करण्यात आला असला तरी याला सभागृहात प्रचंड विरोध झाला. सभा बरखास्त झाल्यानंतर नगरसेवक विलास गाडीवडर, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली. मुन्सिपल हायस्कूलची इमारत नादुरुस्त झाली असल्याने ती पाडण्याचा विचार सभागृहाने केला आहे. पण पीडब्ल्यूडी खात्याने ही इमारत पाडण्याचे पत्र दिले आहे का? किंवा इमारत पाडून सरकारला फक्त जागा हस्तांतरित करण्याचे नेमके गौडबंगाल काय? या जागेवर कोणाचा डोळा आहे काय? अशी विचारणा गाडीवडर यांनी केली.
ते म्हणाले की, मी नगराध्यक्ष असताना एसीपी टीसीपी फंडातून ७५ लाख मुन्सिपल हायस्कूलसाठी अनुदान आणले होते. पण सध्याच्या आमदार-खासदार, मंत्र्यांनी त्यासाठी एक रुपया आणला नाही. उलट मुन्सिपल हायस्कूल मोडण्याचा डाव आखला जात आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी येथे इंग्रजी माध्यम शाळा सुरू केली असून, इथे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर यापूर्वी मराठी माध्यमातून ही असंख्य विद्यार्थी घडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुन्सिपलचे हस्तांतरण करू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या वेळी अनिता पठाडे, जसराज गिरे यांच्यासह विरोधी नगरसेवक उपस्थित होते.